Heat Wave Advisory In India: आला उन्हाळा; 'उष्णतेच्या लाटे'पासून सुरक्षित राहण्यासाठी केंद्र सरकारकडून खास सल्ले!

डीहायड्रेशनचा त्रास जाणवत असल्यास ओआरएस जवळ ठेवण्याचा सल्ला दिला जात आहे.

Heat Wave | pixabay

मार्च महिन्याच्या चाहुलीसोबतच आता उन्हाळा जाणवायला लागला आहे. भारताच्या काही भागात उन्हाच्या झळ्या देखील जाणवत आहेत. केंद्र सरकार कडून Union Ministry of Health and Family Welfare च्या मार्फत हीट व्हेवच्या पार्श्वभूमीवर आता नियमावली जारी करण्यात आली आहे. हीट व्हेवचा सामना कसा करायचा यासाठी काही उपायसूचना सूचवण्यात आला आहे. भारतीय उपखंडामध्ये 2022 साली सर्वात उष्ण मार्च महिना नोंदवण्यात आला होता. हीट व्हेवच्या तडाख्यामध्ये भारत, पाकिस्तानात 90 मृत्यू झाले होते.

हेल्थ अ‍ॅड्व्हायझरी नुसार, नागरिकांना पुरेसे पाणी पिण्याचा सल्ला दिला जात आहे. डीहायड्रेशनचा त्रास जाणवत असल्यास ओआरएस जवळ ठेवण्याचा सल्ला दिला जात आहे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये उपलब्ध फळं देखील मुबलक प्रमाणात खाण्याचा सल्ला दिला जात आहे. ताक, लस्सी, लिंबू सरबत सारखी पेय घरच्या घरी बनवून पिऊ शकता. यामुळे उन्हाचा त्रास कमी करता येऊ शकतो. असे cnbctv18 च्या वृत्तात सांगण्यात आले आहे.

लोकांना मऊसूत, सौम्य रंगाचे आणि सुती कपडे घालण्याचे सल्ले देण्यात आले आहेत. उन्हात बाहेर पडताना डोकं सुरक्षित राहील याची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आले आहेत. घरात उन्हाची झळ बसू नये म्हणून पुरेसे पडदे लावा. वेळोवेळी रेडिओ, वर्तनापत्र, टीव्हीवरून हवामानाबद्दल दिले जाणारे संदेश जाणून घ्या.

लहान मुलं, गरोदर स्त्रिया, वृद्ध मंडळी सोबतच आजारी लोकांनी देखील हिट स्ट्रोक पासून दूर रहावं. दुपारी 12 ते 3 च्या वेळेत विनाकारण घराबाहेर पडणं टाळा. पार्क करून ठेवलेल्या चारचाकीमध्ये मुलांना, पाळीव प्राण्यांना सोडणं टाळावं.