काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांना गुजरात हायकोर्टाचा झटका; लोकसभा निवडणूक लढवण्यावर बंदी
काँग्रेस नेते हार्दिक पटेल आगामी लोकसभा निवडणूक लढवण्यावर न्यायालयाने बंदी घातली आहे.
काँग्रेस नेते हार्दिक पटेल (Hardik Patel) यांना गुजरात उच्च न्यायालयाने (Gujarat High Court) जोरदार झटका दिला आहे. हार्दिक पटेल आगामी लोकसभा निवडणूक लढवण्यावर न्यायालयाने बंदी घातली आहे. अलिकडेच हार्दिक पटेल यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. पटेल यांना जामनगर मधून निवडणूकीचे तिकीट मिळणार असल्याची चर्चाही होती. मात्र न्यायालयाने लोक कायदा, 1951 या कलमाअंतर्गत लोकसभा निवडणूकी लढवण्यावर बंदी घातली आहे.
ANI ट्विट:
23 जुलै 2015 मध्ये पाटीदार आरक्षण आंदोलनादरम्यान मेहसाणा येथे दंगल झाली होती. पाटीदार आंदोलनाची सुरुवात विसनगर सभेपासून झाली होती. त्यानंतर भाजपा आमदार ऋषिकेश पटेल यांच्या कार्यलयात तोडफोड झाली होती. या प्रकरणी कोर्टाने हार्दिक पटेल, लालजी पटेल आणि एके पटेल यांना जुलै 2018 मध्ये दोन वर्षांची शिक्षा आणि 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. तर सुमारे 14 आरोपींना ताब्यात घेण्यात आले होते. सत्र न्यायालयच्या या निर्णयाविरोधात हार्दिक पटेल यांनी याचिका दाखल केली होती. मात्र शुक्रवारी झालेल्या सुनावणीत हायकोर्टाने ही याचिका फेटाळली. सर्व दोषींना जामिन मंजूर झाला असला तरी कोर्टाने हार्दिक पटेल यांच्या निवडणूक लढवण्यावर बंदी घातली आहे.