गुजरात मध्ये लॉकडाउन असताना हजारो स्थलांतरित कामगारांकडून रस्त्यावर उतरत हिंसाचार; दगडफेक आणि जाळपोळ करत घातले थैमान
सुरत (Surat) मध्ये शुक्रवार 10 एप्रिल रोजी रात्री हजारो स्थलांतरित कामगार रस्त्यावर उतरले होते.
कोरोनाच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात 14 एप्रिल पर्यंत लॉक डाऊन (Lock Down) जारी करण्यात आले आहे, मात्र सद्य घडीला कोरोना रुग्णाच्या संख्येत सातत्याने होणारी वाढ पाहता लॉक डाऊनचा कालावधी वाढवला जाण्याची शक्यता आहे, याच भीतीने काल गुजरात (Gujrat) मध्ये काही स्थलांतरित कामगारांनी रस्त्यावर उतरून हिंसाचार करत आपल्याला घरी सोडा अशी मागणी केल्याचे समजतेय. गुजरातमधील सुरत (Surat) मध्ये शुक्रवार 10 एप्रिल रोजी रात्री हजारो स्थलांतरित कामगार रस्त्यावर उतरले होते. हे सर्व कामगार आपल्याला पगार दिला जावा याची तसंच पुन्हा घरी परतण्याची परवानगी दिली जावी अशी मागणी करत होते. यावेळी कामगारांनी हातगाड्या जाळणे, दुकानांची तोडफोड करणे, दगडफेक करून सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करणे असे विद्रोही मार्ग अवलंबले होते. Coronavirus Outbreak: कोरोना बाधितांच्या आकडेवारीत सर्वात मोठी वाढ; 24 तासात 40 बळी, 1035 जणांना लागण, देशातील रुग्णांचा आकडा 7447 वर
डीसीपी राकेश बारोत यांनी दिलेल्या माहितीनुसार, “कामगारांनी अनेक रस्ते अडवून ठेवले होते त्यांच्याकडून दगडफेकही करण्यात आली. पोलिसांनी 60 ते 70 लोकांना ताब्यात घेतले आहे. हे सर्व लोक आपल्याला पुन्हा घरी पाठवण्याची सोय करावी अशी मागणी करत होते. प्राप्त माहितीनुसार, या घटनास्थळी पोलिस व अग्निशमन दलाच्या साहाय्याने लागलेली आग विझवण्यात आली आहे,मात्र यामध्ये सार्वजनिक संपत्तीचे बर्यापैकी नुकसान झाले आहे.
ANI ट्विट
दरम्यान यापैकी अनेक कामगार हे ओडिशाचे नागरिक आहेत हे कामगार वस्त्रोद्योग फॅक्टरीत काम करतात. केंद्र सरकारने देशभरात लॉकडाउन जाहीर केल्यानंतर या कंपन्यांचे उत्पादन थांबले असल्याने या कामगारांच्या हातात काहीच काम नाही. परिणामी पगार सुद्धा मिळालेला नाही, दुसरीकडे घरी परत जाण्याचा विचार करावा तर वाहतूक बंद असल्याने तो ही मार्ग उपलब्ध नाही. परिणामी त्यांनी आपला संताप अशा पद्धतीने व्यक्त केला.यापुर्वी सुद्धा अशाच प्रकारे पोलिसांच्या गाड्या जाळत काही स्थलांतरित कामगारांनी आपला उद्रेक व्यक्त केला होता.