Gujarat Flood Update: गुजरातमध्ये पुरामुळे जनजीवन विस्कळीत, आतापर्यंत 102 जणांचा मृत्यू
या पावसाचा सर्वाधिक फटका गुजरातच्या जुनागडला बसला आहे.
गुजरात राज्यात पावसामुळे आलेल्या पुरामुळे (Gujarat Flood) या भागातील जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. पाऊस आणि पूर यामुळे आतापर्यंत 102 जणांचा मृत्यू झाला आहे. दक्षिण गुजरात आणि सौराष्ट्रमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले जात आहे. स्थानिक प्रशासन आणि एनडीआरएफकडून (NDRF) बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. अशामध्ये आता गुजरातमध्ये पुढच्या 24 तासांमध्ये आणखी मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. (हेही वाचा - Kolhapur Panchganga Water Level: कोल्हापूरात पंचगंगा नदीने ओलांडली इशारा पातळी; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा)
गुजरातमध्ये गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पूर आला आहे. या पूरामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. पूरामुळे रस्त्यांना नदीचे स्वरुप आले आहे. पूराचे पाणी गावांमध्ये शिरल्यामुळे घरांचे मोठे नुकसान झाले आहे. मुसळधार पाऊस आणि पूरामुळे संपत्तीचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे गुजरातमध्ये आतापर्यंत 102 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 4119 जनावरांचा मृत्यू झाला आहे.
गुजरातच्या नवसारी, देवभूमी द्वारका, जुनागड आणि वलसाडमध्ये पावसाने कहर केला आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका गुजरातच्या जुनागडला बसला आहे. याठिकाणी आलेल्या पूरामध्ये अडकलेल्या 736 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते. बचाव कार्यात 358 लोकांना वाचवण्यात यश आले आहे. जुनागडमध्ये गाड्याही वाहून गेल्या. याठिकाणी पूरामुळे घरांचे मोठे नुकसान झाले आहे. पूराच्या पाण्यामध्ये अनेकांचे संसार उपयोगी सामान वाहून गेले आहेत