ग्रीन इंडिया प्रदूषण नियंत्रक फाउंडेशनच्या पत्राची मुंबई उच्च न्यायालयाकडून गंभीर दखल; हाय पॉवर कमिटीला आवश्यक कारवाईचे निर्देश

representative image)

मुंबई : महाराष्ट्रातील वाढत्या पर्यावरणीय व वायू प्रदूषणाच्या गंभीर प्रश्नावर *ग्रीन इंडिया प्रदूषण नियंत्रक फाउंडेशन*ने घेतलेल्या पुढाकाराची मुंबई उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. फाउंडेशनच्या वतीने सादर करण्यात आलेल्या निवेदनावर न्यायालयाच्या स्तरावरून संबंधित *हाय पॉवर कमिटीला आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश* देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबईतील वाढते वातावरणीय व पर्यावरणीय प्रदूषण, औद्योगिक प्रदूषण तसेच पर्यावरण संवर्धनाच्या प्रश्नांवर मुंबई उच्च न्यायालयाने स्वतःहून *(Suo Motu)* दाखल करून घेतलेल्या जनहित याचिकेअंतर्गत उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीला सहकार्य करण्यासाठी *ग्रीन इंडिया प्रदूषण नियंत्रक फाउंडेशनने* पुढाकार घेतला आहे.

फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष *श्री. अनिल महाजन* यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरल यांची प्रत्यक्ष भेट घेऊन यासंदर्भात लेखी निवेदन सादर केले होते. मुंबईतील हवेची खालावलेली गुणवत्ता, औद्योगिक प्रदूषण आणि पर्यावरण संवर्धनासाठी सुरू असलेल्या न्यायालयीन प्रक्रियेला तांत्रिक, व्यावहारिक तसेच प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या पातळीवर सहकार्य करण्याची तयारी फाउंडेशनने या निवेदनातून व्यक्त केली.

फाउंडेशनच्या म्हणण्यानुसार, *31 जुलै 2026 रोजी सादर केलेल्या निवेदनाची न्यायालयीन स्तरावर दखल घेण्यात आली असून*, संबंधित पत्र पुढील कार्यवाहीसाठी *ज्युडिशियल-1 विभागाकडे वर्ग करण्यात आले आहे.* त्यानंतर हे प्रकरण हाय पॉवर कमिटी ला आवश्यक त्या कार्यवाही साठी पाठवण्यात आले असून, पत्रातील मुद्द्यांच्या अनुषंगाने आवश्यक ती योग्य कार्यवाही व पुढील दिशानिर्देश देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दरम्यान, *पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त झालेले पत्र 14 ऑगस्ट 2026 रोजीचे आहे.* या पत्राद्वारे पर्यावरणीय प्रश्नांबाबत संबंधित बाबींची नोंद घेण्यात आली असून, पुढील कार्यवाहीसाठी आवश्यक प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

*पर्यावरण संवर्धनाला मिळणार नवी गती.*

मुंबईतील प्रदूषणाच्या प्रश्नावर न्यायालयीन स्तरावरून संबंधित समितीकडे कार्यवाहीसाठी निर्देश गेल्यामुळे पर्यावरण संरक्षणाच्या प्रयत्नांना अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

*ग्रीन इंडिया प्रदूषण नियंत्रक फाउंडेशन* च्या माध्यमातून बेकायदेशीर प्रदूषण, औद्योगिक प्रदूषण, वृक्षतोड आणि पर्यावरणाच्या ऱ्हासाविरोधात सातत्याने आवाज उठवला जात आहे. तज्ज्ञ, पर्यावरण क्षेत्रातील कार्यकर्ते आणि हाय पॉवर कमिटी यांच्या समन्वयातून मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्यास मदत होईल, असा विश्वास फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अनिल महाजन यांनी व्यक्त केला.

न्यायालयीन प्रक्रियेत फाउंडेशनने केलेल्या पाठपुराव्यामुळे पर्यावरणीय प्रश्नांना अधिक व्यापक व्यासपीठ मिळण्याची शक्यता असून, मुंबईसह महाराष्ट्रातील प्रदूषण नियंत्रणाच्या लढ्याला यामुळे नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement