Garba Dance: युनेस्कोच्या वारसा यादीत समाविष्ट करण्यासाठी भारताकडून गुजरातच्या 'गरबा' नृत्याला नामांकन; लवकरच 'गणेशोत्सव' होऊ शकतो सामील
यासंदर्भात सांस्कृतिक मंत्रालयाच्या सहसचिव लिली पंड्या यांनी सांगितले की, नियमांनुसार दोन वर्षांत या यादीत केवळ एकच हेरिटेज समाविष्ट करता येईल.
भारत सरकारने 2021 च्या अमूर्त यादीमध्ये 'कोलकात्याची दुर्गा पूजा' समाविष्ट करण्याचा प्रस्ताव ठेवला होता, ज्याचा युनेस्को (UNESCO) ने डिसेंबर 2021 मध्ये समावेश केला आहे. आता पुढील वर्षी, 2023 मध्ये गुजरातमधील गरबा नृत्य (Garba Dance) आणि 2025 मध्ये मुंबईचा गणेशोत्सव देखील युनेस्कोच्या हेरिटेज यादीत समाविष्ट होऊ शकतो. युनेस्कोने आज दिल्लीतील राष्ट्रीय संग्रहालयात आपल्या अमूर्त वारशाच्या यादीत कोलकाता येथील दुर्गापूजेचा समावेश केल्याचा उत्सव साजरा केला.
या उत्सवासाठी, युनेस्कोच्या सांस्कृतिक युनिटचे सचिव आणि भारतातील युनेस्कोचे प्रतिनिधी यांनी सांस्कृतिक मंत्रालयाच्या सहकार्याने दिल्लीतील राष्ट्रीय संग्रहालयात दुर्गापूजेच्या विशेष सादरीकरणासह कार्यक्रमाचे आयोजन केले होते. युनेस्कोचे दिल्लीचे संचालक एरिक फाल्ट म्हणाले की, युनेस्कोच्या अमूर्त हेरिटेजमध्ये समाविष्ट करण्यासाठी भारताकडे अजूनही मोठा खजिना आहे, ज्याचा वेळोवेळी या यादीत समावेश केला जाईल.
आतापर्यंत युनेस्कोने भारतातील 38 स्मारकांना जागतिक वारसा दर्जा दिला आहे. परंतु असे दिसून आले आहे की भारतात असे अनेक सण आणि जत्रा आहेत ज्यांना अमूर्त वारशाच्या श्रेणीमध्ये सूचीबद्ध केले जाऊ शकते. या अंतर्गत, आतापर्यंत भारतातील 14 अमूर्त वारसा युनेस्कोच्या यादीत समाविष्ट करण्यात आला आहे.
यामध्ये वैदिक मंत्रोच्चाराची परंपरा, रामलीला, संस्कृत नाटक परंपरा- कूडिअट्टम, गढवालचा उत्सव- राममन, केरळची नाट्य नृत्य परंपरा- मेडीयेट्टू, राजस्थानची कालबेलिया नृत्य संगीत परंपरा, छाऊ नृत्य, लडाखचे बौद्ध मंत्रोच्चारण, मणिपुरचे संकीर्तन, योग, नौरोज, कुंभमेळा, पंजाबमधील जंदियाला गुरु येथील पारंपारिक पितळ आणि तांब्यापासून भांडी बनवण्याची कला कोलकाता दुर्गा पूजा यांचा समावेश आहे. (हेही वाचा: Elephants in Kerala: केरळमध्ये केवळ 448 हत्ती शिल्लक; गेल्या 5 वर्षांत 115 बंदिस्त हत्तींचा मृत्यू)
पुढील वर्षी, 2023 मध्ये, गुजरातच्या गरबा नृत्याला युनेस्कोच्या हेरिटेज यादीत स्थान मिळू शकते. यासंदर्भात सांस्कृतिक मंत्रालयाच्या सहसचिव लिली पंड्या यांनी सांगितले की, नियमांनुसार दोन वर्षांत या यादीत केवळ एकच हेरिटेज समाविष्ट करता येईल. गुजरातचे गरबा नृत्य 2023 साठी प्रस्तावित करण्यात आले आहे. मुंबईच्या गणेशोत्सवाचाही भविष्यात विचार केला जात आहे. सर्व काही सुरळीत राहिल्यास 2025 मध्ये मुंबईच्या गणेश उत्सवाला या यादीत स्थान मिळेल.