आर्थिक मंदीचा जोर ओसरला? धनत्रयोदशी निमित्त देशात 30 टन सोने विक्री
या दिवशी तब्बल 30 टन सोने विक्री झाली असून हा आकडा प्रतिवर्षीपेक्षा 25 टक्के कमी आहे. असं असलं तरीही मंदीच्या काळात ही बाब उल्लेखनीय आहे.
मागील काही दिवसात देशात आर्थिक मंदीचे (Financial Recession) सावट होते, अशातच दिवाळसण (Diwali 2019) आल्याने सोने विक्रेत्यांपासून (Gold Sell) ते फटाके उत्पादकांपर्यंत साऱ्यांनाच व्यापाराची चिंता होती. धनत्रयोदशीच्या (Dhanteras 2019) निमित्ताने दरवर्षी देशात सोने विक्री बाजारात गती पाहायला मिळते पण यावर्षी किमान खप होईल का इथपासून अनेक प्रश्न या विक्रेत्यांना भेडसावत होते, मात्र सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, यंदा धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणात सोन्याची विक्री झाल्याचे समजत आहे. या दिवशी तब्बल 30 टन सोने विक्री झाली असून हा आकडा प्रतिवर्षीपेक्षा 25 टक्के कमी आहे. असं असलं तरीही मंदीच्या काळात ही बाब उल्लेखनीय आहे.
'इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन'चे (आयबीजेए) राष्ट्रीय सचिव सुरेंद्र मेहता यांच्या मते गेल्या काही वर्षांपपासून धनत्रयोदशीदिवशी जवळपास 40 टन सोन्याची खरेदी होत असल्याचे दिसून आले आहे. मात्र, यंदा गेल्या वर्षी पेक्षा सोन्याच्या भावात प्रति 10 ग्राम म्हणजे एक तोळ्यामागे सात हजाराची वाढ झाली आहे .सोन्याचे भाव वाढल्याने सोन्याची विक्री 20 टनांच्या आसपास राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र आश्चर्याने ही शक्यता कमी ठरून सोन्याचे विक्री वाढली आहे.
अमेरिका-चीन यांच्यातील व्यापार युद्धाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजारात यंदा सोन्याच्या भावात आणि परिणामी आयात दराने मोठी उसळी घेतली. झाल्याने देशांतर्गत बाजारात सोन्याचे भाव वरच्या पातळीवर गेले होते. ऑगस्ट महिन्यात तर मुंबईतील सोने बाजारपेठेत प्रति तोळा 40 हजारांचा एकदा गाठला होता तर दिवाळी पर्यंत हे भाव आणखीन वधारण्याची शक्यता होती. इतकंच नव्हे तर धनत्रयोदशीच्या दिवशी सुद्धा मुंबई, पुणे, नागपूर , नाशिक या प्रमुख शहरात 38,500 रुपये प्रति दहा ग्राम इतके दर होते, तरी सुद्धा आता सोने विक्रीचा वाढलेला टक्का हा मंदीचा जोर ओसरल्याची सुचिन्हे दर्शवणारा आहे.