कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत कोविडमुळे प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबियांना निवृत्तीवेतन मिळणार
पीएम केअर्स फॉर चिल्ड्रेन अंतर्गत घोषित केलेल्या उपाययोजनांव्यतिरिक्त - कोविड बाधित मुलांचे सक्षमीकरण, कोविडमुळे कर्ता सदस्य गमावलेल्या कुटुंबांना मदत करण्यासाठी भारत सरकारने आणखी उपाययोजना जाहीर केल्या आहेत. त्याद्वारे ते कोविड मुळे मरण पावलेल्यांच्या कुटुंबांना निवृत्तीवेतन तसेच वाढीव आणि व्यापक विमा भरपाई देतील. पंतप्रधान म्हणाले की त्यांचे सरकार त्यांच्या कुटुंबियांसोबत एकजुटीने उभे आहे. ते म्हणाले की या योजनांच्या माध्यमातून त्यांना भेडसावणाऱ्या आर्थिक अडचणी कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ईएसआयसी) अंतर्गत कुटुंब निवृत्तीवेतन
कुटुंबास सन्मानाचे जीवन जगण्यासाठी आणि चांगले जीवनमान कायम ठेवण्यासाठी, रोजगाराशी संबंधित मृत्यू प्रकरणांसाठी असलेला ईएसआयसी निवृत्तीवेतन योजनेचा लाभ कोविडमुळे मरण पावलेल्यांनाही देण्यात येत आहे. अशा व्यक्तींवर अवलंबून असलेल्या कुटुंबातील सदस्य विद्यमान नियमांनुसार कर्मचाऱ्यांच्या सरासरी दैनंदिन वेतनाच्या 90% इतका निवृत्तीवेतनाचा लाभ मिळण्यास पात्र असतील. हा लाभ 24.03.2020 पासून आणि अशा सर्व प्रकरणांसाठी 24.03.2022 पर्यंत पूर्वलक्षी प्रभावाने लागू असेल.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना- कर्मचार्यांची 'ठेवी संलग्न विमा योजना' (ईडीएलआय):
ईडीएलआय योजनेतील विमा लाभात वाढ करून त्याची व्याप्ती ही वाढवली आहे. इतर सर्व लाभार्थ्यांव्यतिरिक्त, हे विशेषत: कोविडमुळे आपला जीव गमावलेल्या कर्मचार्यांच्या कुटूंबास मदत करेल. विम्याचा कमाल लाभ 6 लाख रुपयांवरून 7 लाख रुपये करण्यात आला आहे. 2.5 लाख रुपयांच्या किमान विमा लाभाची तरतूद पुनर्संचयित केली गेली आहे आणि 15 फेब्रुवारी 2020 पासून पुढील तीन वर्षांसाठी पूर्वलक्षी प्रभावाने लागू असेल.
कंत्राटी / हंगामी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना लाभ देण्यासाठी केवळ एका आस्थापनेमध्ये कायम नोकरीची अट शिथिल केली गेली आहे, ज्याद्वारे मृत्यूपूर्वी 12 महिन्यांत नोकरी बदललेल्या अशा कर्मचार्यांच्या कुटुंबीयांना लाभ देण्यात आला आहे.
श्रम व रोजगार मंत्रालयामार्फत या योजनांची सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येत आहे.