Fake Nursing Institute in Gujarat: गुजरातमध्ये बनावट नर्सिंग इन्स्टिट्यूटचा पर्दाफाश, विद्यार्थ्यांकडून लाखोंची फसवणूक
त्यानंतर माँ कमल फाउंडेशनचे संचालक डॉ अनिल गोहिल यांना अटक केली.
Fake Nursing Institute in Gujarat: गुजरात पोलिसांनी नर्मदा जिल्ह्यातील एका बनावट परिचारिका प्रशिक्षण संस्थेचा (Fake Nursing Institute) पर्दाफाश केला आहे. ज्यात तीन वर्षांचा नर्सिंग प्रोग्राम शिकवण्याच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून भरमसाठ फी आकारली जात होती. परीक्षा देऊनही प्रमाणपत्र मिळत नसल्याने विद्यार्थी आणि पालकांनी पोलिसांत धाव घेतली. त्यानंतर शनिवारी ही घटना उघडकीस आली. माँ कमल फाऊंडेशनचे (Maa Kamal Foundation) संचालक डॉ.अनिल गोहिल यांना पोलिसांनी कारवाईदरम्यान अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संस्थेने विद्यार्थ्यांना 12वी नंतर नर्सिंगचे प्रशिक्षण दिल्यानंतर प्रमाणपत्र देण्याचे आश्वासन दिले होते. तीन वर्षे उलटूनही विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले गेले नाही, तेव्हा विद्यार्थ्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. विद्यार्थ्यांना सांगण्यात आले होते की, संस्था विद्यार्थांना तीन वर्षांचा नर्सिंग कोर्स देत आहे. ज्यासाठी 1.65 लाख रुपये शुल्क आकारले जाणार होते. त्यानंतर नर्सिंगचे प्रमाणपत्र दिले जाईल आणि त्या आधारे खासगी रुग्णालयात नोकरीही उपलब्ध होईल.
त्यानंतर मोठ्या प्रमामात विद्यार्थ्यांनी संपूर्ण शुल्क भरले. अॅडमिशन घेतले. विद्यार्थ्यांना सामान्य नर्सिंग आणि मिडवाइफरी अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्यात आला. तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर त्यांना प्रमाणपत्र देणे आवश्यक होते. या काळात विद्यार्थ्यांना नर्सिंगचे धडे आणि सहा महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यांना व्यावसायिक प्रशिक्षणासाठी सुरतमधील वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. जिथे त्यांना दरमहा 3,000 रुपये स्टायपेंड म्हणून दिले गेले.
2022 मध्ये, संस्थेने दावा केला की परीक्षा बंगळुरूमध्ये होतील. परंतू नंतर विद्यार्थ्यांना सांगण्यात आले की त्यांची हॉल तिकिटे अनुपलब्ध आहेत. 2023 मध्ये त्याच कारणाची पुनरावृत्ती झाली. यावर्षी, विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा बंगळुरूला पाठवण्यात आले. परंतु त्यांना केवळ आंशिक परीक्षांना उपस्थित राहण्यास सांगितले गेले, कोणत्याही प्रात्यक्षिक चाचण्या घेतल्या गेल्या नाहीत.
त्यानंतर प्रमाणपत्रांसाठी पालकांकडून संस्थेवर दबाव आणला असता, फाउंडेशन उत्तरे देण्यात अपयशी ठरले, त्यामुळे निराश झालेल्या विद्यार्थ्यांनी डॉ. गोहिल आणि इतरांविरुद्ध पोलिस तक्रार दाखल केली. संस्थेकडून पूर्ण शुल्क आकारण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.