Dr. Manmohan Singh Health Update: माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांची प्रकृती बिघडली; AIIMS मध्ये उपचारासाठी दाखल
मनमोहन सिंह (Ex PM Dr. Manmohan Singh) यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्ली मधील एम्स (AIIMS) रुग्णालयात दाखल केले आहे. कार्डिओ-थोरॅसिक वॉर्डमध्ये मनमोहन सिंह यांना निरीक्षणासाठी ठेवले आहे
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह (Ex PM Dr. Manmohan Singh) यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्ली मधील एम्स (AIIMS) रुग्णालयात दाखल केले आहे. कार्डिओ-थोरॅसिक वॉर्डमध्ये मनमोहन सिंह यांना निरीक्षणासाठी ठेवले आहे. आज, रविवारी 10 मे रोजी त्यांना अचानक छातीत दुखू लागल्याने त्यांनी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या प्रकृतीबाबत अद्याप सविस्तर माहिती समोर आलेली नाही, पीटीआय या वृत्तसंस्थेने त्यांना रुग्णालयात दाखल केले असल्याची प्राथमिक माहिती दिली आहे. अलीकडेच कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने तयार आजी- माजी मंत्र्यांच्या केलेल्या विशेष संघटनेत त्यांनी उपस्थिती लावली होती. देशाला कोरोनाशी लढा द्यायचा असेल तर केवळ लॉक डाऊन वर अवलंबून राहता येणार नाही असे मत त्यावेळेस सिंह यांनी व्यक्त केले होते.
मनमोहन सिंह हे 87 वर्षीय असून अनेक वर्षांपासून त्यांना हृदयविकाराने ग्रासले आहे.त्यांच्या प्रकृतीच्या समस्यांवरून त्यांनी 2014 मध्ये पंतप्रधान पदाच्या दावेदारीतुन स्वतःला वेगळे ठेवले होते. तसेच सक्रिय राजकारणापासून ते दूर झाले होते. राज्यसभेचे खासदार असताना मात्र त्यांनी नियमितपणे संसदीय अधिवेशनात हजेरी लावली आहे.
PTI ट्विट
दरम्यान, मनमोहन सिंह यांनी 2004 ते 2014 या काळात पंतप्रधानपदाची जबाबदारी पार पाडली होती. तत्कालीन पंतप्रधान नरसिंहराव यांच्या सरकारमध्ये अर्थमंत्री म्हणून त्यांची नियुक्ती झाल्यानंतर 1991 पासून ते कॉंग्रेसशी संबंधित होते. 1991 साली भारतीय अर्थव्यवस्थेला संकटातून बाहेर काढण्यात मनमोहन सिंह यांनी मोलाची कामगिरी केली होती.