Divya Mittal quits IAS IIT-IIM पदवीधर, लंडनची नोकरी सोडून IAS झालेल्या दिव्या मित्तल यांचा 13 वर्षांच्या प्रशासकीय सेवेला अलविदा

उत्तर प्रदेश केडरच्या 2013 बॅचच्या आयएएस अधिकारी दिव्या मित्तल यांनी 13 वर्षांच्या प्रशासकीय सेवेनंतर स्वेच्छेने राजीनामा दिला आहे. देवरिया, मिर्झापूर आणि संत कबीरनगर येथे जिल्हाधिकारी म्हणून काम केलेल्या मित्तल यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत आपल्या निर्णयाची माहिती दिली.

Divya Mittal

उत्तर प्रदेश केडरच्या आयएएस अधिकारी दिव्या मित्तल (Divya Mittal) यांनी 13 वर्षांच्या प्रशासकीय कारकिर्दीला रविवारी पूर्णविराम दिला. सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहित त्यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली. "आज मी स्वेच्छेने 13 वर्षांच्या अविस्मरणीय प्रवासाला विराम देत आयएएस सेवेचा राजीनामा दिला आहे," असे त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले.

2013 बॅचच्या या अधिकारी सध्या उत्तर प्रदेश महसूल विभागात विशेष सचिव पदावर कार्यरत होत्या. मे 2026 मध्ये त्यांची देवरियाहून लखनऊला बदली करण्यात आली होती. त्यांच्या राजीनाम्याला सक्षम प्राधिकरणाकडून औपचारिक मंजुरी मिळाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

साधी पार्श्वभूमी, असामान्य प्रवास

दिव्या मित्तल यांचे शिक्षण साध्या वातावरणात झाले. त्यांनी आयआयटी दिल्लीतून बी.टेक तर आयआयएम बंगळुरूमधून पदव्युत्तर व्यवस्थापन शिक्षण पूर्ण केले. यानंतर त्यांनी लंडनमध्ये जेपी मॉर्गन कंपनीत एप्रिल 2007 ते जुलै 2008 या काळात असोसिएट म्हणून काम केले.

परदेशात व्यावसायिक यश मिळवूनही त्यांच्या मनात एक अपूर्णतेची भावना कायम होती. "सर्वकाही मिळवूनही काहीतरी अपूर्ण वाटत होते. देशापासून दूर राहणे मला सतावत होते," असे त्या म्हणाल्या.

देशाप्रती असलेल्या जबाबदारीच्या भावनेतून त्यांनी भारतात परतण्याचा निर्णय घेतला आणि यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करून त्या आयएएस सेवेत दाखल झाल्या.

देवरिया, मिर्झापूर आणि संत कबीरनगरचे धडे

आपल्या कारकिर्दीत मित्तल यांनी देवरिया, मिर्झापूर आणि संत कबीरनगर या जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले. या पदस्थापनांनी आपली प्रशासकीय दृष्टी घडवल्याचे त्यांनी सांगितले.

"देवरियाने मला शिकवले की योग्य गोष्टीच्या बाजूने उभे राहणे हा पर्याय नसून कर्तव्य आहे. मिर्झापूरने मला शिकवले की 'अशक्य' हे सत्य नसून केवळ एक मत आहे," असे त्या म्हणाल्या.

मिर्झापूरमधील विंध्यवासिनी मातेच्या मंदिराशी असलेल्या आपल्या भावनिक नात्याचाही त्यांनी उल्लेख केला. "विंध्यवासिनी मातेच्या चरणी बसून मला कळले की खरी शक्ती कोणत्याही पदातून नव्हे तर तिच्या कृपेतून आणि जनतेच्या विश्वासातून येते," असे त्यांनी सांगितले.

जमिनीचे हक्क मिळालेली कुटुंबे, दिव्यांग व्यक्तींना मिळालेला सन्मान आणि शेतकऱ्यांच्या शेतांपर्यंत पोहोचलेले पाणी, या क्षणांनी आपली न्यायाबद्दलची खरी समज घडवल्याचे त्यांनी नमूद केले.

'मी दिले नाही, उलट खूप काही मिळाले'

आपल्या सेवाकाळाचा आढावा घेताना मित्तल म्हणाल्या की, आपण काहीतरी देण्यासाठी सेवेत आलो असे वाटत होते, मात्र प्रत्यक्षात आपल्याला दिलेल्यापेक्षा कितीतरी अधिक मिळाले. "मी मूर्ख होते, मला वाटत होते मी काहीतरी देण्यासाठी आले. सत्य हे आहे की मला सर्वाधिक मिळाले, आणि हे ऋण अधिकच वाढत गेले. मला इतके प्रेम, इतका आदर, इतकी आपुलकी मिळाली की माझी झोळी भरून गेली," असे त्यांनी सांगितले.

लाहुरिया दिह गावातील एका वृद्ध महिलेच्या आठवणीचाही त्यांनी उल्लेख केला. गावात प्रथमच पाणी पोहोचल्यानंतर त्या महिलेने शब्दांशिवाय आपल्या थरथरत्या हातांनी मित्तल यांच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला होता. "पद आज मागे राहील, पण तो स्पर्श या आयुष्यात कधीच विसरणार नाही," असे मित्तल म्हणाल्या.

पुढे काय?

आपला राजीनामा जाहीर करताना मित्तल यांनी आपल्या पुढील योजनांबाबत कोणतीही स्पष्ट माहिती दिलेली नाही. त्या राजकारण, शिक्षण किंवा उद्योजकतेत उतरणार का, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मात्र भारतासाठी पाहिलेले स्वप्न आयएएस सोडल्यानंतरही आपल्यासोबत राहील, असे त्यांनी नमूद केले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement