आर्थिक मंदी असूनही 2018-19 मध्ये 6 राष्ट्रीय पक्षांची भरघोस कमाई; उत्पन्नामध्ये 166 % वाढ
परंतु या कालावधीत एक राष्ट्रवादी (NCP) वगळता देशातील राष्ट्रीय राजकीय पक्षांच्या (Political Parties) उत्पन्नात सुमारे 166 टक्के वाढ झाली आहे.
भारतात गेल्या एक वर्षापासून आर्थिक मंदी सुरू आहे, त्यामुळे लोकांच्या उत्पन्नासह त्यांची खर्च करण्याची क्षमताही कमी होत आहे. परंतु या कालावधीत एक राष्ट्रवादी (NCP) वगळता देशातील राष्ट्रीय राजकीय पक्षांच्या (Political Parties) उत्पन्नात सुमारे 166 टक्के वाढ झाली आहे. या राजकीय पक्षांच्या उत्पन्नातील सर्वात मोठा वाटा निवडणूक रोख्यांमधून मिळालेल्या देणग्यांचा आहे. 6 पक्षांची एकूण कमाई 3698 कोटी रुपयांवर गेली आहे. एकूण कमाईच्या बाबतीत भाजप (BJP) अव्वल आहे. मात्र, एका वर्षात सर्वात मोठी वाढ तृणमूल कॉंग्रेसच्या (TMC) कमाईत झाली आहे.
राजकीय पक्षांच्या एकूण उत्पन्नामधील 3698 पैकी, 2410 कोटी रुपये एकटे भाजपचे आहेत, जे सर्व पक्षांच्या एकूण महसुलाच्या 65.16 टक्के आहे. असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) च्या अहवालानुसार, 2017-18 आणि 2018-19 या आर्थिक वर्षात 6 राजकीय पक्ष (भाजपा, कॉंग्रेस, सीपीएम, बसपा, तृणमूल कॉंग्रेस आणि भाकप) च्या कमाईत 2308.92 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. त्यापैकी एकटे 52% म्हणजेच 1931.43 कोटी रुपये इलेक्टोरल बॉन्डमधून आले आहेत.
2014 पासून केंद्रात सरकार चालवत असलेल्या भारतीय जनता पक्षाने 2018-19 या आर्थिक वर्षात एकूण 2410.08 कोटी रुपये उत्पन्न जाहीर केले आहे. या रकमेपैकी पक्षाने 41.71 टक्के म्हणजेच 1005.33 कोटी रुपये खर्च केले आहेत. कॉंग्रेसने या एका वर्षात 918.03 कोटी रुपये कमावले आहेत, त्यापैकी पक्षाने 51.19 टक्के म्हणजेच 469.92 कोटी रुपये खर्च केले आहेत.
ममता बॅनर्जी यांच्या अखिल भारतीय तृणमूल कॉंग्रेसविषयी बोलायचे झाले तर, वर्षभरात या पक्षाने 192.65 कोटींची कमाई केली असून, त्यापैकी पक्षाने 11.50 कोटी खर्च केले आहेत, जे कमाईच्या 5.97 टक्के आहे.