Jammu and Kashmir: शाळांमध्ये भजन, सूर्यनमस्कारावर बंदी घालण्याची मागणी; Majlis-e-Ulema ची राज्य सरकार आणि शिक्षण विभागाला विनंती
पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या (PDP) प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी दावा केला होता की, भाजप मुस्लिम मुलांना शाळेत भजन गाण्यास भाग पाडून जम्मू-काश्मीरमध्ये हिंदुत्वाचा अजेंडा राबवत आहे.
जम्मू काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) इस्लामिक संघटनेने (Islamic Body) शाळांमध्ये भजन, सूर्यनमस्कारावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. इस्लामिक संघटना मुत्ताहिदा मजलिस-ए-उलेमा (MMU) ने जम्मू-काश्मीरमधील शाळांमध्ये भजन आणि सूर्यनमस्कारावर बंदी घालण्याची विनंती राज्य सरकार आणि शिक्षण विभागाला केली आहे. एमएमयु हा काश्मीरमधील सुमारे 30 इस्लामिक धार्मिक आणि शैक्षणिक संघटनांचा समूह आहे.
एमएमयुने मुलांच्या पालकांना आवाहन केले आहे की, जर त्यांच्या मुलांना सरकारी शाळांमध्ये गैर-इस्लामी उपक्रमांमध्ये भाग घेण्यास भाग पाडले जात असेल, तर त्यांनी आपल्या मुलांना या शाळांमधून काढून खाजगी शाळांमध्ये दाखल करावे. यापूर्वी जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी दावा केला होता की, मुस्लिम विद्यार्थ्यांना शाळांमध्ये भजन गाण्यास भाग पाडले जात होते.
पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या (PDP) प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी दावा केला होता की, भाजप मुस्लिम मुलांना शाळेत भजन गाण्यास भाग पाडून जम्मू-काश्मीरमध्ये हिंदुत्वाचा अजेंडा राबवत आहे. मेहबूबा मुफ्ती यांनी त्यांच्या ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये कुलगाममध्ये शाळकरी मुले 'रघुपती राघव राजा राम' हे भजन गाताना दिसत आहेत. मुफ्ती यांनी लिहिले की, ‘धार्मिक विद्वानांना तुरुंगात टाकणे, जामा मशीद बंद करणे आणि शाळेतील मुलांना हिंदू भजन गाण्याचे निर्देश देणे, याने काश्मीरमधील भारत सरकारचा खरा हिंदुत्वाचा अजेंडा उघड होतो.’ (हेही वाचा: अयोध्येत बनतोय लता चौक, योगी सरकारने उद्घाटनासाठी दिले लता मंगेशकर यांच्या कुटुंबाला आमंत्रण)
दुसरीकडे नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांनी मेहबुबा मुफ्ती यांचा हिंदुत्वाचा दावा फेटाळून लावला होता. ते म्हणाले होते, ‘आमचा द्विराष्ट्र सिद्धांतावर विश्वास नसल्याचे अब्दुल्ला म्हणाले होते. भारत जातीयवादी नाही, तो धर्मनिरपेक्ष आहे. मी भजन करतो, जर मी भजन करत असेल तर त्यात चुकीचे काय आहे? जर एखादा हिंदू अजमेर दर्ग्यात गेला तर तो काय मुस्लिम होईल का?’ यासह जम्मू-काश्मीर भाजप युनिटचे अध्यक्ष रविंदर रैना यांनी मुफ्ती यांनी राजकीय स्वार्थासाठी येथील तरुणांच्या मनात विष कालवल्याचा आरोप केला होता.