CSMT- Sawantwadi Road Daily Express Train: सीएसएमटी-सावंतवाडी रोड स्थानका दरम्यान रोज धावणार नवी एक्सप्रेस; पहा थांबे
नव्या सेवेमुळे मुंबई आणि दक्षिण कोकण दरम्यान थेट रेल्वे प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे. यामुळे दादर, ठाणे, पनवेल, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी रोड यांसारख्या महत्त्वाच्या स्थानकांना जोडणार असून, यामुळे महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागातील दळणवळण अधिक सुलभ होणार आहे.
कोकण मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी आहे. भारतीय रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), मुंबई आणि सावंतवाडी रोड (Sawantwadi Road) दरम्यान नव्या एक्सप्रेस गाडीला मंजुरी दिली आहे. ही गाडी दररोज धावणार आहे. ही गाडी १५०८७/१५०८८ या क्रमांकाने धावणार असून, तिचा मार्ग सुमारे ५१० किलोमीटर लांबीचा आहे. या
22 स्थानकांवर थांबा, पर्यटक व प्रवाशांना फायदा
नव्या गाडीचा फायदा पर्यटक, विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी तसेच मुंबई महानगर प्रदेश आणि दक्षिण कोकण दरम्यान नियमित प्रवास करणाऱ्या नागरिकांना होणार आहे. ही गाडी मुंबईहून सावंतवाडी रोडकडे जाताना १५०८७ क्रमांकाने आणि परतीच्या प्रवासात १५०८८ क्रमांकाने धावेल.
सीएसएमटी ते सावंतवाडी रोड दरम्यान कोणत्या स्थानकांवर थांबणार?
सीएसएमटी ते सावंतवाडी रोड दरम्यान गाडीचे थांबे एकूण 22 स्थानकांवर असतील, ज्यामध्ये दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरावली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड या प्रमुख स्थानकांवर व्यावसायिक थांबे देण्यात आले आहेत.
प्रवाशांच्या दीर्घकाळापासूनच्या मागणीला यश
मुंबई आणि दक्षिण कोकण दरम्यान सुधारित रेल्वे कनेक्टिव्हिटीची मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती. या पार्श्वभूमीवर नव्या दैनंदिन एक्सप्रेस गाडीची मंजुरी प्रवाशांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. मात्र गाडी सुरू होण्याची निश्चित तारीख आणि वेळापत्रक याबाबतची सविस्तर माहिती रेल्वे प्रशासनाकडून स्वतंत्रपणे जाहीर केली जाणारआहे.
पर्यटन आणि अर्थव्यवस्थेला चालना
ही नवी सेवा पर्यटन, शिक्षण, रोजगार, व्यापार तसेच सामाजिक कारणांसाठी प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना थेट, विश्वासार्ह आणि सोयीस्कर पर्याय उपलब्ध करून देणारआहे. मुंबई महानगर प्रदेश आणि कोकण किनारपट्टीवरील महत्त्वाच्या शहरांमधील अंतर या गाडीमुळे कमी वेळेत पार करता येणार आहे.
सद्यस्थितीत मुंबई आणि सावंतवाडी दरम्यान तुतारी एक्सप्रेससारख्या काही गाड्या धावतात, मात्र प्रवाशांची वाढती संख्या आणि कोकणातील पर्यटनाला मिळणारी चालना लक्षात घेता अतिरिक्त गाडीची गरज सातत्याने व्यक्त केली जात होती. रेल्वे मंत्रालयाच्या या निर्णयामुळे कोकण रेल्वे मार्गावरील ताण काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.\
नवी एक्सप्रेस गाडी प्रत्यक्षात कधीपासून सुरू होणार, याबाबतची अधिकृत घोषणा रेल्वे प्रशासनाकडून लवकरच अपेक्षित आहे.