Covid-19 Vaccine Update: देशात Sputnik V लसीचे उत्पादन ऑगस्ट महिन्यापासून सुरु

रशियाची स्पुटनिक व्ही लस नागरिकांसाठी उपलब्ध होणार असून ऑगस्ट महिन्यापासून भारतात या लसीच्या उत्पादनाला सुरुवात होणार असल्याची माहिती भारतीय राजदूत डी बाला वेंकटेश वर्मा यांनी दिली.

Sputnik V | Image used for Representational purpose only | File Image

भारताच्या कोविड-19 लसीकरण (Covid-19 Vaccination) मोहिमेत कोवक्सिन, कोविशिल्ड सोबतच स्पुटनिक व्ही (Sputnik V ) लसीचा देखील समावेश झाला आहे. लवकरच नागरिकांसाठी ही लस उपलब्ध होणार असून ऑगस्ट महिन्यापासून भारतात या लसीच्या उत्पादनाला सुरुवात होणार असल्याची माहिती रशिया मधील भारतीय राजदूत डीबी वेंकटेश वर्मा यांनी दिली. तसंच ही लस भारतीयांसाठी तीन टप्प्यात उपलब्ध होणार असल्याचेही ते म्हणाले.

पहिल्या टप्प्यात थेट वापरण्याची लस (Ready To Use Vaccines) रशियाहून भारतात पाठवण्यात येतील. दुसऱ्या टप्प्यात ही लस मोठ्या प्रमाणावर देशाला पुरवण्यात येईल आणि भारतीय फार्मा कंपन्या लहान बाटल्यांमध्ये भरण्याचे काम करतील. तिसऱ्या टप्प्यात लस निर्मितीचे तंत्र भारतीय फार्मा कंपन्यांसोबत शेअर करण्यात येईल आणि त्यानंतर देशात लसीच्या उत्पादनाला सुरुवात होईल, असे डी बाला वेंकटेश वर्मा यांनी सांगितले.

मे महिन्याअखेर पर्यंत भारतात 30 लाख लसी आयात होण्याची शक्यता आहे. जून महिन्याच्या अखेरपर्यंत ही संख्या वाढून 50 लाख इतकी होईल. तिन्हीही टप्प्यांमध्ये एकूण 850 मिलियन रशियन लसीचे डोसेस भारताला उपलब्ध होतील.

Dr Reddy’s Laboratories ने आतापर्यंत एकूण 2.1 लाख स्पुटनिक व्ही लसीचे डोस आयात केले आहेत. रशियन लसीसाठी Dr Reddy’s Laboratories हे भारतीय फार्मा पार्टनर्स आहेत. मे महिन्याच्या अखेरीस पर्यंत भारताला 30 लाख लसींचा साठा उपलब्ध होणार असून देशातील फॉर्मा कंपन्या ते डोसेस बाटल्यांमध्ये भरतील. (Vaccine Tourism in Russia: 1.30 लाखात रशियाची 24 दिवसांची ट्रीप आणि Sputnik V चे दोन डोस; भारतीयांसाठी ट्रॅव्हल्स कंपनीचे पॅकेज सुरू)

दरम्यान,  भारताला स्पुटनिक लाईट लस पाठवण्यात देखील रशियाला रस आहे. मात्र भविष्यात भारताकडून त्यासंबंधित काही पाऊल उचलले गेले तर ती लसही भारताला उपलब्ध होईल. मात्र भारतीय औषध नियामकांनी अद्याप या लसीला मान्यता दिलेली नाही. मान्यता मिळाल्यानंतरच यासंबंधी पुढे चर्चा होईल. स्पुटनिक लाईट ही सिंगल डोस लस असून गमलेया रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ एपिडिमोलॉजी अँड मायक्रोबायोलॉजी यांनी विकसित केली आहे.