तामिळनाडू येथील सॉफ्टवेयर कंपनी ने तयार केले Humanoid Robot; कोरोना बाधितांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना करणार मदत
तामिळनाडू येथील एका सॉफ्टवेअर कंपनीने देखील एक अनोखी मदत पुढे केली आहे.
कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) संकटावर मात करण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने मदत करत आहेत. तामिळनाडू (Tamil Nadu) येथील एका सॉफ्टवेअर कंपनीने देखील एक अनोखी मदत पुढे केली आहे. तामिळनाडू मधील तिरुचिरापल्ली (Tiruchirappalli) येथील एका सॉफ्टवेअर कंपनीने डॉक्टरांच्या मदतीसाठी एका ह्यूमनॉयड रोबोट (Humanoid Robot) ची निर्मिती केली आहे. हा रोबोट कोरोना व्हायरसची बाधा झालेल्यांची सेवा करण्यात डॉक्टरांची मदत करेल. विलगीकरण कक्षात रुग्णांपर्यंत औषधं पोहचवण्याचं काम हे रोबोट्स करतील. अशा प्रकारचे 4 रोबोट्स वापरासाठी तयार आहेत. हे रोबोट्स सरकारी हॉस्पिटलमध्ये मदत म्हणून दान करण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाची परवानगी मिळाल्यास या रोबोट्सचा वापर करण्यात येईल, अशी माहिती हॉस्पिटलच्या डिनने दिली आहे.
देशातील कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येमुळे डॉक्टरांसह वैद्यकीय कर्मचाऱ्यांवरील ताणही वाढत आहे. तसंच कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनाही कोरोनाची लागण झाल्याचे अनेकदा समोर आले आहे. त्यामुळे डॉक्टरांवरील ताण कमी करण्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी रोबोट्सचा वापर करणे सोयीचे ठरु शकते. मात्र सध्या ह्यूमनॉयड रोबोट्सची टेस्टिंग सुरु आहे.
ANI Tweet:
भारतात कोरोना व्हायरसने 30 जणांचा बळी घेतला असून 1071 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना व्हायरसच्या या संकटावर मात करण्यासाठी सेलिब्रेटींसह अनेकजण आर्थिक मदत केली जात आहे. त्याचबरोबर सामान्य नागरिकही यथाशक्ती मदत करत आहेत. दरम्यान या सॉफ्टवेअर कंपनीनेही ह्यूमनॉयड रोबोटच्या माध्यमातून एक आगळीवेगळी मदत पुढे केली आहे.