Congress On Narendra Modi: उत्तरकाशी बोगदा दुर्घटनेवरुन काँग्रेसची टीका, एक्स हँडलवर शेअर केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो; भाजपकडून तत्काळ प्रतिक्रिया
पक्षाने X वर एक व्यंगचित्र पोस्ट केले ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हातात हिरवा झेंडा दाखवला होता.
Uttarkashi Tunnel Updates: उत्तराखंडच्या सिल्कियारा-बरकोट बोगद्यात दोन आठवड्यांहून अधिक काळ अडकलेल्या 41 कामगारांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरु असताना काँग्रेसने (Congress) मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीकास्त्र सोडले. पक्षाने X वर एक व्यंगचित्र पोस्ट केले ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हातात हिरवा झेंडा दाखवला होता. या चित्रात असे सुचवले होते की अडकलेल्या कामगारांचे पंतप्रधान बोगद्याच्या बाहेर स्वागत करतील. प्रत्युत्तरात, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस दुष्यंत कुमार गौतम यांनी काँग्रेसच्या टीकेला "दुर्भाग्यपूर्ण" संबोधले आणि या कठीण काळात प्रार्थना आणि पाठिंबा देण्यापेक्षा उपहास केल्याबद्दल टीका केली.
उत्तरकाशीतील कोसळलेल्या बोगद्यातून अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्याचे बचावकार्य मंगळवारीही सुरूच होते. ऑगर ड्रिलिंग मशिनमध्ये बिघाड झाल्यानंतर ढिगाऱ्यातून मॅन्युअल ड्रिलिंग सुरू करण्यासाठी रॅट-होल खाण तज्ञांना पाचारण करण्यात आले. सोमवारी संध्याकाळपर्यंत, तुटलेल्या ऑगर ड्रिलिंग मशीनचे अवशेष काढून टाकण्यात आले आणि अपूर्ण सुटण्याच्या मार्गात प्रगती करण्यासाठी एक स्टील पाईप घातला गेला. मजूरांपर्यंत पोहोचण्यासाठी आता काहीच अंतर उरले आहे. ज्यामुळे त्यांना बाहेर काढण्यात लवकरच यश येईल, असा विश्वास व्यक्त केला जातो आहे. (हेही वाचा, Uttarkashi Tunnel Collapse Rescue Update: उत्तरकाशीत बोगद्यात अडकले 41 जीव, Vertical Drilling सह 'या' 5 पर्यायांमुळे बचावकार्य होणार सोप)
दरम्यान, वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, उत्तरकाशी बोगद्यामध्ये हाय पॉवर ड्रिलिंग मशीनचा वापर करुन मोठे छिद्र पाडण्याचे काम सुरु आहे. ज्यामुळे एक मोठी नळी बोगद्यात अडकेल्या मजुरांपर्यंत पोहोचवली जाईल. दरम्यान, मजूरांपर्यंतचे पोहोचण्यासाठीचे अंतर फारच कमी असल्याने जर ड्रिल करण्यासाठीचे ऑगर मशीन खराब झाले तर आता यंत्रावर अवलंबून न राहता थेट बाहेरील मजुरांकडून हाताने खोदकाम करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
दुसऱ्या बाजूला मायक्रो टनलिंग एक्स्पर्ट्सनी म्हटले आहे की, काल म्हणजेच 27 नोव्हेंबरच्या रात्री काम चांगल्या प्रकारे झाले. एका रात्रीत जवळपास 50 मीटरपर्यंत बोगदा करण्यात आला. आता केवळ पाच ते सहा मीटर अंतर कापणे बाकी आहे. काल रात्री आम्हाला बोगदा खणताना कोणताही अडथळा आला नाही. बऱ्याच गोष्टी सकारात्मक असल्याचे संकेत आम्हाला मिळाले.
एक्स पोस्ट
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तामध्ये म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील पाठिमागील काही दिवसांपासून बोगद्यात अडकलेल्या मजूरांना बाहेर काढण्याच्या मोहीमेवर लक्ष ठेऊन आहेत. दरम्यान, त्यांनीही या मोहीमेला बळ यावे आणि बोगद्यातील कामगारांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी नागरिकांनी प्रार्थना करावी, असे अवाहन त्यांनी जनतेला केले.