Citizen Amendment Bill: भाजप आमदाराचे घर जाळले; आंदोलनाने घेतले हिंसक वळण

आसाम राज्यात कालपासून तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे. आज तर आंदोलकांनी राज्यात अनेक ठिकाणी जाळपोळ करत या विधेयकाला विरोध दर्शविला आहे.

Fire (Photo Credits: IANS|Representational Image)

Citizen Amendment Bill: काल लोकसभेनंतर राज्यसभेतही नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यात आले. परंतु या विधेयकाला देशातील अनेक भागात विरोध दर्शवण्यात येत आहे. आसाम राज्यात कालपासून तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे. आज तर आंदोलकांनी राज्यात अनेक ठिकाणी जाळपोळ करत या विधेयकाला विरोध दर्शविला आहे.

आसाम मध्ये आज काही आंदोलकांनी भाजपच्या एका आमदाराचं घर पेटवून दिलं आहे. काही वेळापूर्वी गुवाहाटी क्लबच्या बाहेर पोलीस आणि आंदोलकांमध्ये जोरदार हाणामारी झाली.त्यानंतर आंदोलकांना दूर पळवण्यासाठी पोलिसांना लाठीमार केला व अश्रूधुर सोडला.

तसेच गुवाहाटीमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परंतु, त्यानंतरही आंदोलकांनी संचारबंदीला न जुमानता प्रचंड आंदोलन केलं. डिब्रुगड येथील चाबुआ या विभागामध्ये आंदोलकांनी भाजपचे स्थानिक आमदार विनोद हजारिका यांच्या घराला आग लावली. इतकंच नव्हे तर त्यांच्या घराखाली पार्क केलेल्या वाहनांनाही पेटवण्यात आले.

दरम्यान, आसाम मधील तणावाची स्थिती पाहता संपूर्ण राज्यात इंटरनेट सेवा ठप्प करण्यात आली होती. तसेच आज आसाममधून रवाना होणाऱ्या लांबपल्ल्याच्या गाड्या आणि विमानसेवा रद्द करण्यात आली आहे.

Citizen Amendment Bill: तुम्ही ज्या शाळेत शिकता त्या शाळेचे आम्ही हेडमास्टर; शिवसेना खासदार संजय राऊत यांचा भाजपला टोला

दरम्यान, काल नागरिकत्व विधेयक मंजूर झाल्यामुळे कित्येक लाख लोक भारताचं नागरिकत्व घेऊन साममध्येच वास्तव्य करणार असल्याची अफवा पसरली आहे. आणि म्हणूनच आसाममधील सामान्य लोक आंदोलकांची भूमिका घेत रस्त्यावर उतरले आहेत