Chhattisgarh Road Accident: छत्तीसगडमध्ये भीषण रस्ते अपघात; कंपनीच्या कर्मचाऱ्यांची बस खाणीत पडल्याने 11 जणांचा मृत्यू, 20 जखमी, पीएम मोदींनी व्यक्त केला शोक

सध्या जखमींवर व्यवस्थित उपचार करण्याची व्यवस्था करण्यात आली असून मृतांची ओळख पटवली जात आहे. सध्या पोलीस अपघाताची माहिती मृतांच्या नातेवाईकांना देत आहेत.

Chhattisgarh Road Accident (Photo Credit : ANI)

Chhattisgarh Road Accident: छत्तीसगडमधील (Chhattisgarh) दुर्ग जिल्ह्यात आज रात्री झालेल्या एका रस्ते अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला. सायंकाळी उशिरा कामगारांना घेऊन जाणारी बस लाल मुरूम खाणीत पडल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताच्या वेळी बसमध्ये सुमारे 31 लोक होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बस खाणीत पडल्याने आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे, तर उर्वरित 20 जण गंभीर जखमी झाले आहेत. कुम्हारी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खपरी गावात ही खाण आहे.

कुम्हारी परिसरात केडिया डिस्टिलरीजची ही बस होती, जी या उद्योगातील कामगारांना घेऊन जात होती. या बसमध्ये 31 कर्मचारी होते. ही बस खपरी गावाजवळून जात असताना बसवरील नियंत्रण सुटले आणि काही वेळातच बस 40 फूट मातीच्या खाणीत कोसळली.

बस खाणीत पडल्यानंतर स्थानिक लोकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. या संपूर्ण प्रकाराची माहिती स्थानिक नागरिकांनी तात्काळ पोलिसांना दिली. पोलीस तात्काळ दाखल झाले आणि बचावकार्य सुरू करण्यात आले. 40 फूट खाली पडलेल्या बसमधून लोकांना कसेबसे बाहेर काढण्यात आले. अनेक रुग्णवाहिका आणि स्थानिक लोक घटनास्थळी पोहोचले. एक एक करून सर्वांनी बसमधील सर्व जखमी आणि मृतदेह बाहेर काढले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. सध्या जखमींवर व्यवस्थित उपचार करण्याची व्यवस्था करण्यात आली असून मृतांची ओळख पटवली जात आहे. सध्या पोलीस अपघाताची माहिती मृतांच्या नातेवाईकांना देत आहेत. जखमींची प्रकृती जाणून घेण्यासाठी स्थानिक प्रशासनाचे सर्व अधिकारी रुग्णालयात पोहोचले आहेत. (हेही वाचा: Earthquake in Gujarat: गुजरातच्या भावनगरमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के; रिश्टर स्केलवर 3.1 इतकी मोजली गेली तीव्रता)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही बस अपघातावर शोक व्यक्त केला आहे. पीएम मोदींनी 'X' वर पोस्ट करत लिहिले की, ‘छत्तीसगडच्या दुर्गमध्ये झालेला बस अपघात अतिशय दुःखद आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्याबद्दल माझ्या संवेदना. यासोबतच जखमींची प्रकृती लवकरात लवकर बरी होवो अशी मी कामना करतो. राज्य सरकारच्या देखरेखीखाली, स्थानिक प्रशासन पीडितांना शक्य ती सर्व मदत करत आहेत.’ छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई यांनीही या अपघातावर शोक व्यक्त केला आहे.