Char Dham Yatra 2022: यमुनोत्री महामार्ग बंद; 10 हजार प्रवासी, भाविक अडकले
नोंदणीशिवाय यात्रेकरूंना ऋषिकेशच्या वर जाऊ दिले जात नाही.
उत्तराखंड (Uttarakhand) मध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे चार धाम यात्रेमध्ये (Char Dham Yatra) पुन्हा अडथळा निर्माण झाला आहे. उत्तरकाशी जिल्ह्यातील स्यानाचट्टी आणि रणचट्टी दरम्यानचा रस्ता खचल्याने यमुनोत्री महामार्ग काल 20 मे ला संध्याकाळी मोठ्या वाहनांची रहदारी बंद करण्यात आली आहे. सध्या यमुनोत्री परिसरात अनेक भाविक, प्रवासी अडकल्याची बाब समोर आली आहे. दरम्यान दामटा ते जानकीचट्टी दरम्यानचे प्रवासी देखील यमुनोत्रीचा मार्ग कधी खुला होणार याची वाट पाहत आहे. युद्धपातळी काम करून हा मार्ग खुला करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
मीडीया रिपोर्ट्सनुसार, यमुनोत्री मंदिराकडे जाणार्या हायवे ची सेफ्टी वॉल कोसळल्याने सुमारे 10 हजार जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. सध्या या मार्गावरील वाहतूक ठप्प आहे. आणि नजिकच्या भागात 10 हजार जण अडकले आहेत. रस्ता पुन्हा खुला होण्यासाठी 3 दिवस लागू शकतात त्यामुळे आता मोठ्या वाहनांमधून लहान वाहनांमध्ये नागरिक घेऊन त्यांना बाहेर काढले जात आहे. हे देखील नक्की वाचा: Kedarnath: दोन वर्षांनंतर केदारनाथ मंदिराचे घेता येणार दर्शन, आजपासुन केदारनाथ मंदिर भक्तांसाठी खुले .
चारधाम यात्रेला जाणाऱ्या प्रवाशांची ऑफलाइन नोंदणी बंद करण्यात आली आहे. नोंदणीशिवाय यात्रेकरूंना ऋषिकेशच्या वर जाऊ दिले जात नाही. अशा परिस्थितीत ऋषिकेश, हरिद्वारसह परिसरात साडेनऊ हजार यात्रेकरू अडकून पडले आहेत. सध्या या सार्यांना हॉटेल, धर्मशाळा, लॉजमध्ये तात्पुरते हलवण्यात आल्याने ऋषिकेश आणि हरिद्वार पूर्णपणे खचाखच भरले आहेत.