Bijnor Road Accident: हृदयद्रावक! बिजनौरमध्ये कार आणि टेम्पोची धडक; अपघातात वधू-वरांसह 7 जणांचा मृत्यू

गावापासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या अग्निशमन केंद्राजवळ हा भीषण अपघात झाला. ही धडक इतकी जोरदार होती की, टेम्पोमध्ये प्रवास करणाऱ्या वधू-वरांसह सात जणांचा जागीच मृत्यू झाला.

Accident प्रतिकात्मक प्रतिमा (फोटो सौजन्य - File Image)

Bijnor Road Accident: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बिजनौर जिल्ह्यात (Bijnor District) झालेल्या भीषण अपघातात (Accident) सात जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. लग्नसमारंभ आटोपून वधूसोबत घरी परतत असताना हा अपघात झाला. राष्ट्रीय महामार्ग 74 वर एका वेगवान कारने टेम्पोला धडक दिली. या अपघातात टेम्पो रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पलटी झाला. गावापासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या अग्निशमन केंद्राजवळ हा भीषण अपघात झाला. ही धडक इतकी जोरदार होती की, टेम्पोमध्ये प्रवास करणाऱ्या वधू-वरांसह सात जणांचा जागीच मृत्यू झाला.

मृतांमध्ये खुर्शीद (65), त्यांचा मुलगा विशाल (25), सून खुशी (22), मुमताज (45), त्यांची पत्नी रुबी (32) आणि मुलगी बुशरा (10) यांचा समावेश आहे. या अपघातात टेम्पो चालकालाही जीव गमवावा लागला आहे. या अपघातात कारमधील सोहेल अल्वी आणि अमन हे गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (हेही वाचा -Dehradun Car Accident: डेहराडूनमध्ये भीषण रस्ता अपघात; इनोव्हा आणि ट्रकच्या धडकेत 6 तरुणांचा मृत्यू, 1 जखमी (Video))

दरम्यान, अपघाताची माहिती मिळाल्यानंतर स्थानिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमींना रुग्णालयात नेले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. तथापी, बिजनौर रस्ता अपघाताची मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दखल घेतली आहे. योगी यांनी मृतांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त केला असून जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करून उपचार करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. (हेही वाचा - Accident On Thane-Belapur Road: दिघाजवळ ठाणे-बेलापूर रोडवर एसटी बसची दुचाकीस्वाराला धडक; 29 वर्षीय तरुणाचा मृत्यू)

पोलिसांनी सर्व मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री दीडच्या सुमारास हे कुटुंब मुरादाबाद रेल्वे स्थानकावर उतरले होते. प्राप्त माहितीनुसार, बिजनौरमधील धामपूर पोलीस ठाण्याच्या तिबरी गावात हे कुटुंब वास्तव्यास होते.