काय सांगता! चाहत्याने घरातच बांधले डोनाल्ड ट्रंप यांचे मंदिर; रोज करतो पूजा, दीर्घायूष्यासाठी दर शुक्रवारी उपवास

मात्र चक्क भारतामध्ये ही गोष्ट घडली आहे

डोनाल्ड ट्रंप यांचा भक्त (संग्रहित संपादित प्रतिमा)

जगातील सर्वात सामर्थ्यवान देशाचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप (Donald Trump) यांनी कधीच विचार केला नसेल, की कोणी त्यांचे मंदिर बांधून त्यांची उपासना करेल. मात्र चक्क भारतामध्ये ही गोष्ट घडली आहे. तेलंगाना (Telangana) राज्यात डोनाल्ड ट्रंप यांचा असा जबरा चाहता आहे, की त्याने चक्क आपल्या घरात ट्रंप यांचे मंदिर (Donald Trump Temple) उभारले आहे. बुसा कृष्णा (Bussa Krishna) असे या व्यक्तीचे नाव असून, गेली अनेक वर्षे तो डोनाल्ड ट्रंप यांची उपासना करीत आहे.

सध्या परिस्थिती अशी आहे की, कृष्णाची निस्सीम भक्ती पाहून डोनाल्ड ट्रंप यांचे त्याच्या आयुष्यातील स्थान हे कृष्णाच्या आई-वडिलांपेक्षा मोठे असल्याचे भासते.

चार वर्षांपूर्वी जेव्हा ट्रंप अमेरिकेचे अध्यक्ष बनले, तेव्हाही बुसाने ट्रम्प यांची पूजा केली होती. कृष्णाने आपल्या घरात ट्रंप यांचा मोठा पुतळा उभा केला आहे. ट्रम्पला देव मानणाऱ्या बुसाने, एक जबरदस्त चाहता म्हणून आपली व ट्रंप यांची भेट घडवून द्यावी अशी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. महत्वाचे म्हणजे बुसाला मंदिर बनवण्याची प्रेरणा स्वतः ट्रंप यांनी दिल्याचे त्याचे म्हणणे आहे.

चार वर्षापूर्वी जेव्हा ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले, तेव्हा ते आपल्या स्वप्नात आले होते. त्या दिवसापासून आपण त्यांच्या उपासनेला सुरुवात केली असे कृष्णा म्हणतो. हे जाणूनही तुम्हाला आश्चर्य वाटेल की, कृष्णा दर शुक्रवारी डोनाल्ड ट्रम्प यांच्या दीर्घ आयुष्यासाठी उपवास ठेवतो. डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव त्याच्या घराच्या प्रत्येक भिंतींवर लिहिलेले आहे.

(हेही वाचा: पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी भक्ताने बांधले मंदिर; देव समजून रोज करतो पूजा व आरती (Photo))

मात्र बुसाची इतक्या मोठ्या प्रमाणातील ट्रंप भक्ती समाजाला व त्याच्या नातेवाईकांना मान्य नाही. अनेक लोकांनी विरोध करूनही बुसाचे ट्रंप प्रेम कमी झाले नाही. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 24-25 फेब्रुवारी रोजी भारत दौर्‍यावर येणार आहेत. ट्रम्प अहमदाबाद, दिल्ली आणि आग्रा या शहरांना भेट देतील. ट्रंप यांच्या दोऱ्याची मोठी जय्यत तयारी सुरु आहे. कृष्णाचा भगवंत साक्षात ट्रंप भारतात येत आहे हे पाहून त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही.