India-China Border Issue: भारत-चीन सीमा वादाच्या मुद्द्यावरुन भाजप-काँग्रेसच्या घाणेरड्या राजकारणामुळे पेट्रोल-डिझेल दरवाढीचा मुद्दा मागे पडतोय- मायावती
या मुद्द्याचा जनतेशी थेट संबंध आहे. माझी केंद्र सरकारला इतकीच विनंती आहे की काहीही करुन पेट्रोल डिझेल दर कमी करा अथवा नियंत्रणात ठेवा.
बहुजन समाजवादी पक्ष (BSP) सर्वेसर्वा मायावती (Mayawati) यांनी चीन भारत सीमावाद (India-China Face-Off in Ladakh) मुद्द्यावरुन सत्ताधारी भाजप (BJP) आणि विरोधातील काँग्रेस (Congress) पक्षाकडून सुरु असलेल्या राजकारणावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. भाजप आणि काँग्रेस यांच्यात चीन मुद्द्यावरुन सुरु असलेले घाणेरडे राजकारण देशहिताचे नाही. या दोन्ही पक्षांच्या राजकारणात सध्या महत्त्वाचा असलेला पेट्रोल डिझेल दरवाढ मुद्दा मागे पडतो आहे, असेही मायावती यांनी म्हटले आहे.
वृत्तसंस्था आयएनएसशी बोलताना मायावती यांनी म्हटले आहे की, भारत चीन मुद्द्यावरुन सत्ताधारी भाजप आणि विरोधात असलेली काँग्रेस घाणेरडे राजकारण करत आहे. दोन्ही पक्षातील राजकारण देशहीताला मारक आहे. तसेच या राजकारणामुळे देशहिताचे मुद्दे मागे पडत आहेत.
बसपा सुप्रीमो मायावती यांनी पुढे म्हटले आहे की दोन्ही पक्षांच्या लढाईत पेट्रोड-डिझेल दरवाढीचा मुद्दा मागे पडत आहे. या मुद्द्याचा जनतेशी थेट संबंध आहे. माझी केंद्र सरकारला इतकीच विनंती आहे की काहीही करुन पेट्रोल डिझेल दर कमी करा अथवा नियंत्रणात ठेवा. (हेही वाचा, अमित शहा यांचे राहुल गांधी यांना चोख उत्तर! नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश कोरोना आणि चीन विरुद्ध दोन्ही लढाया जिंकेल असा ठाम विश्वास)
भारत चीन सीमेवर अद्यापही तणाव कायम आहे. गलवान खोऱ्यात दोन्ही बाजूंच्या सैन्यामध्ये झटापट झाली आहे. यात भारताचे 20 जवान शहीद झाले आहेत. दुसऱ्या बाजूचे म्हणजे चीनचे जवान मात्र किती मारले गेले याबाबत अधिकृत आकडेवारी चीनने जाहीर केली नाही. मात्र, या घटनेनंतर भारताने घेतलेल्या भूमिकेवरुन चीन काहीसा नरमला आहे. दोन्ही देशांमध्ये अद्यापही वाटाघाटी सुरुच आहेत.