Birthplace of Lord Hanuman: तिरुमाला तिरुपति देवस्थानमकडून भगवान हनुमानाच्या जन्मस्थानाची घोषणा; अंजनाद्री टेकड्यांवरच अंजनीपुत्राचा जन्म झाल्याचा दावा 

त्याचबरोबर आंध्र प्रदेशचादेखील या विषयावर स्वतंत्र दावा होता. ते म्हणतात की, हनुमानजीचा जन्म तिरुपतीमध्ये असलेल्या 7 पर्वतांपैकी एकामध्ये झाला होता, ज्याला अंजनाद्री देखील म्हणतात.

Lord Hanuman (Image used for Representational purpose only

भारतामध्ये अशा अनेक प्राचीन, पौराणिक गोष्टी आहेत ज्यांच्याबाबत अजूनही वाद सुरु आहे. त्यातीलच एक गोष्ट म्हणजे भगवान हनुमानाचे जन्मस्थळ (Birthplace of Lord Hanuman). अंजनीपुत्र हनुमानाचा जन्म नक्की कुठे झाला याबाबत कर्नाटक (Karnataka) आणि आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) मध्ये गेले अनेक महिने वाद सुरु आहे. दोन्ही राज्यांनी आपापल्या राज्यात अंजनीपुत्राचा जन्म झाल्याचा दावा केला आहे. याबाबत निर्णय घेण्यासाठी तिरुमाला तिरुपति देवस्थानम (TTD) ने एक समिती गठीत केली होती. आता तिरुमाला तिरुपती देवस्थानमने सांगितले आहे की, भगवान हनुमानाचा जन्म अंजनाद्री टेकड्यांवरच झाला होता.

टीटीडी म्हणते की, विद्वान लोकांच्या उच्चस्तरीय समितीला असे आढळले की भगवान हनुमानाचे जन्मस्थान अंजनाद्री हिल्स आहे. डिसेंबर 2020 मध्ये टीटीडीने, राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. मुरलीधर शर्मा, एसव्ही वैदिक विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. सानिध्यानम शर्मा, इस्रो वैज्ञानिक रेमिनी मूर्ती, राज्य पुरातत्व उपसंचालक विजयकुमार, प्राध्यापक राणीदाससिव मुर्ती, जे. रामकृष्ण आणि शंकर नारायण यांच्या समितीची स्थापना केली होती. टीटीडीने प्रथम तेलुगु नववर्ष दिन ऊगादीदिवशी हनुमानाच्या जन्मस्थळाची घोषणा करण्याचे ठरवले होते. परंतु नंतर निर्णय बदलण्यात आला आणि आज रामनवमीच्या दिवशी ही घोषणा केली गेली. (हेही वाचा: Ram Navami निमित्त पंढरपूरच्या विठ्ठल रूक्मिणी मंदिरामध्ये फुलांची नयनरम्य आरास; पहा फोटोज)

यापूर्वी कर्नाटकामधून दावा केला जात होता की, हनुमानाचा जन्म किष्किन्धाच्या अंजनाद्री टेकडीवर झाला होता. त्याचबरोबर आंध्र प्रदेशचादेखील या विषयावर स्वतंत्र दावा होता. ते म्हणतात की, हनुमानजीचा जन्म तिरुपतीमध्ये असलेल्या 7 पर्वतांपैकी एकामध्ये झाला होता, ज्याला अंजनाद्री देखील म्हणतात. या वादामध्ये शिवमोगाच्या एका मठ प्रमुखांनी दावा केला होता की, हनुमानाचा जन्म उत्तर कन्नड जिल्ह्यातील गोकर्ण येथे झाला होता. मात्र आता टीटीडीच्या समितीने आंध्र प्रदेशमध्ये हनुमानाचा जन्म झाल्याचे सांगितले आहे.

समितीने प्राचीन साहित्य, शिलालेख, ऐतिहासिक आणि खगोलशास्त्रीय गोष्टींच्या आधारे ‘महत्त्वपूर्ण पुरावे’ गोळा केले आहेत. टीटीडीच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ही पुस्तिका टीटीडी वेबसाइटवर देखील अपलोड केली जाईल.