Bihar Hooch Tragedy: बिहारमध्ये बनावट दारूमुळे झालेल्या मृत्यूंची संख्या 77 वर; NHRC ने सरकारला बजावली नोरीस

सुमारे सहा हजार लिटर देशी-विदेशी दारू व स्पिरीट जप्त करण्यात आले आहे.

Queue outside a liquor shop | (Photo Credits: PTI)

बिहारमधील (Bihar) बनावट दारू (Toxic Hooch) दुर्घटनेतील मृतांची संख्या 77 वर पोहोचली आहे. सर्वाधिक मृत्यू सारण जिल्ह्यात झाले आहेत. वृत्तानुसार, सिवान जिल्ह्यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर बेगुसराय जिल्ह्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील इतर भागातही बनावट दारूमुळे मृत्यू झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. रिपोर्ट्सनुसार, विषारी दारूमुळे 25 जणांची दृष्टी गेली आहे.

यापैकी 30 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याने बळींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. यापैकी 12 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेच्या तिसर्‍या दिवशीही मृत्युंमुळे हाहाकार माजला. रिपोर्ट्सनुसार, शुक्रवारी मशरक, अमनौर आणि इसुआपूरमध्ये 28 लोकांचा मृत्यू झाला. काही ठिकाणी नातेवाइकांनी घाईघाईत मृतदेह जाळल्याची बाब समोर येत आहे.

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC) या घटनेबाबत बिहार सरकारला नोटीस बजावली आहे. मीडिया रिपोर्ट्सची दखल घेत, NHRC ने लवकरात लवकर या प्रकरणी राज्य सरकारकडून सविस्तर अहवाल मागवला आहे. आयोगाने पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याची सद्यस्थिती, रुग्णालयात दाखल झालेल्या पीडितांवर उपचार आणि पीडितांच्या कुटुंबीयांना दिलेली भरपाई यासह तपशील मागवला आहे. (हेही वाचा: मध्य प्रदेशात अवघ्या 12 वर्षीय मुलाचा कर्डिएक अरेस्टने मृत्यू)

NHRC ने एप्रिल 2016 पासून बिहारमध्ये बेकायदेशीर दारूच्या विक्री आणि सेवनावर बंदी घालणारे धोरण अंमलात आणण्यात राज्य सरकारच्या अपयशावरही ताशेरे ओढले आहेत. सारणचे जिल्हा दंडाधिकारी राजेश मीना यांनी सांगितले की, या प्रकरणी आतापर्यंत 213 जणांना अटक करण्यात आली आहे. सुमारे सहा हजार लिटर देशी-विदेशी दारू व स्पिरीट जप्त करण्यात आले आहे. या घटनेच्या तपासाबाबत दारूबंदी विभागाच्या दोन सदस्यीय तपास पथकाचा अहवाल अद्याप अपर मुख्य सचिवांना प्राप्त झालेला नाही. शनिवारी अहवाल सादर होणे अपेक्षित आहे.