HAM writes to PM Narendra Modi: रामविलास पासवान यांच्या मृत्यूची चौकशी व्हावी; हिंदुस्थानी अवाम मोर्चा पक्षाचे पंतप्रधान मोदी यांना पक्ष

बिहार विधानसभा निवडणुकीचा दुसरा टप्पा सुरु असताना हमने हे पत्र दिले आहे. त्यामुळे पुढे काय घडते याबाबत उत्सुकता आहे.

Ram Vilas Paswan | (Photo Credits: Facebook)

माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान (Ram Vilas Paswan) यांच्या मृत्यूबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत या मृत्यूची चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी (Jeetan Ram Manjhi) यांच्या हिंदुस्थानी अवाम मोर्चा (HAM) पक्षाने ही मागणी केली आहे. हम पार्टीने (HAM party) याबाबत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पत्र लिहीले आहे. या पत्रात या मृत्यूची न्यायालयीन चौकशी व्हावी असे म्हटले आहे. बिहार विधानसभा निवडणूक 2020 साठी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे. आता दुसरा आणि तीसरा टप्पा बाकी असतानाहा हा मुद्दा पुढे आला आहे. त्यामुळे बिहारमध्ये हा मुद्दा राजकीयदृष्ट्या किती प्रभावशाली ठरतो याबाबत उत्सुकता आहे.

हम पार्टीचे प्रवक्ते डॉ. दानिश रजवान यांनी या प्रकरणात लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष यांच्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दानिश रिजवान यांनी म्हटले आहे की, देश जाणून घेऊ इच्छितो की की, अखेर चिराग पासवान रामविलास पासवान यांच्यासंबंधिचे कोणत्या गोष्टी लपवत आहेत. ते लपवत असलेल्या गोष्टी देशासमोर आल्या पाहिजेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात हम पार्टीने म्हटले आहेकी, रामविलास पासवान यांच्या मृत्यूबाबत अनेक प्रश्न निर्माण होतात. ज्याची सुई लोजपा अध्यक्ष चिराग पासवान यांच्याकडे जाते. रामविलास पासवान यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. परंतू, त्यांच्या आरोग्याची माहिती देणारे कोणतेच मेडिकल बुलेटीन जारी करण्यात आले आही. त्यामुळे त्यांच्या आरोग्याबाबत अनेक लोक अंधारात राहिले. कोणाच्या सांगण्यावरुन पासवान यांना केवळ तीनच लोकांना भेटण्याची परवानगी मिळाली होती? असा सवाल हमने विचारला आहे. (हेही वाचा, Ram Vilas Paswan & Politics of Bihar: रामविलास पासवान- मताधिक्याने निवडणूक जिंकलेला विश्वविक्रमी चेहरा, NDA आणि बिहारच्या राजकारणाला झटका)

दरम्यान, हम (HAM) पक्षाने दावा केला आहे की, त्यांच्यासोबतच वरील सर्व प्रश्नांची उत्तरे रामविलास पासवान यांचे समर्थक, कार्यकर्ते आणि बिहारमधील जनता जाणून घेऊ इच्छिते. बिहार विधानसभा निवडणुकीचा दुसरा टप्पा सुरु असताना हमने हे पत्र दिले आहे. त्यामुळे पुढे काय घडते याबाबत उत्सुकता आहे.