IPL Auction 2025 Live

Bihar: बाबो! लग्नात माशाचा तुकडा न वाढल्याने दोन पक्षात हाणामारी; तब्बल 11 जण जखमी

यामध्ये दोन्ही बाजूंचे 11 लोक जखमी झाले आहेत. ही घटना भोरे पोलीस स्टेशन परिसरातील सिसई टोला येथील भटवलिया गावची आहे.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit: Wikimedia Commons)

बिहारच्या (Bihar) गोपाळगंजमध्ये लग्नाच्या मेजवानीत माशाच्या (Fish) तुकड्यावरून दोन पक्षांमध्ये मोठा राडा झाला आहे. यामध्ये दोन्ही बाजूंचे 11 लोक जखमी झाले आहेत. ही घटना भोरे पोलीस स्टेशन परिसरातील सिसई टोला येथील भटवलिया गावची आहे. लग्नात माशाचे मुंडके खाण्यावरून हा वाद झाला. सर्व जखमींना गोपाळगंज सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापूर्वीही गोपाळगंजमधील उचकागाव पोलिस ठाण्याच्या नरकटिया येथे लग्नात पुरी-भाजी खाण्याच्या वादातून गोळीबार झाला होता. या गोळीबारामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री छठू गोंडकडे वरात आली होती. लग्नसमारंभात मासे-भात खाण्याची व्यवस्था केली होती. त्यादरम्यान, माशाचे मुंडके वाढले नाही म्हणून किरकोळ वाद सुरु झाला. त्यानंतर याची परिणती मोठ्या भांडणात झाली व गोष्ट एकमेकांना हाणामारी करण्यापर्यंत गेली. सदर रुग्णालयात उपचारासाठी दाखल जखमी सुदामा गोंडच्या म्हणण्यानुसार मुलगा राजू गोंड व मुन्ना गोंड हे मासे वाढत होते. सुरुवातील माशाचे दोन तुकडे वाढले गेले व जेव्हा माशाचे मुंडके मागितले व ते न दिल्याने हे भांडण सुरु झाले.

त्यानंतर राजू गोंड आणि मुन्ना गोंड यांना मारहाण केली गेली. दरम्यान, छठू गोंड यांच्यासह इतर लोक तेथे पोहोचले, तोपर्यंत मारामारी आणि खुर्च्यांची मोडतोड सुरु होती. या जेवणावरून झालेल्या चकमकीत दोन्ही बाजूंचे 11 लोक जखमी झाले.

हा गोंधळ शांत झाल्यावर, आजूबाजूच्या लोकांच्या मदतीने काही जखमींना रेफरल हॉस्पिटल भोरे येथे दाखल करण्यात आले, तर काहींना सदर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचल्यावर त्यांनी घटनास्थळी दाखल होऊन या प्रकरणाचा तपास केला. जखमींच्या निवेदनांसह या प्रकरणात एफआयआर नोंदविण्याची तयारी केली जात असल्याचे सांगण्यात येत आहे.