बिहारचे शिक्षणमंत्री Mewalal Choudhary यांनी दिला पदाचा राजीनामा; आजच स्वीकारला होता पदभार, जाणून घ्या कारण

बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वात नवीन सरकार स्थापन केले गेले आहे, परंतु इथला वाद अजून काही संपला नाही.

Mewalal Choudhary resigns | (Photo Credits: ANI)

विधानसभा निवडणुका संपल्यानंतर आणि नवीन सरकार स्थापन झाल्यानंतरही बिहार (Bihar) मधील राजकीय नाट्य संपल्याचे दिसत नाही. बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वात नवीन सरकार स्थापन केले गेले आहे, परंतु इथला वाद अजून काही संपला नाही. शिक्षणमंत्री मेवालालाल चौधरी (Education Minister Mewalal Choudhary) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मेवालालाल चौधरी यांनी आजच शिक्षणमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला होता, परंतु पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर लगेचच त्यांनी राजीनामा दिला. मेवालालाल चौधरी यांना जेडीयू कोट्यातून मंत्री करण्यात आले होते.

सध्या भ्रष्टाचाराच्या (Corruption) आरोपामुळे मेवालालाल चौधरी विरोधी पक्षांच्या निशाण्यावर आहेत. या आरोपांमुळेच मुख्यमंत्री नितीशकुमार यांची भेट घेतल्यानंतर मेवालालाल चौधरी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. एवढेच नव्हे तर त्यांच्या राजीनाम्याचा लिफाफा राजभवनात पोहोचलाही आहे. डॉ. मेवालालाल चौधरी यांनी राजीनामा दिल्यानंतर जेडीयूचे प्रवक्ते अजय आलोक यांनी आरजेडीवर जोरदार हल्ला केला. ते म्हणाले की, राबडी देवी आणि तेजस्वी कधी राजीनामा कधी देतील? यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. (हेही वाचा: Rahul Gandhi on Central Government: हा विकास आहे की विनाश? राहुल गांधी यांचे केंद्र सरकारवर टीकास्त्र)

मेवालाल चौधरी 2012 मध्ये 161 सहाय्यक प्राध्यापक-सह-कनिष्ठ शास्त्रज्ञांच्या नियुक्तीतील कथित अनियमिततेमुळे निशाण्यावर आहेत. भागलपूर जिल्ह्यातील बिहार कृषी विद्यापीठाचे कुलगुरू असताना हा घोटाळा उघडकीस आला होता.  त्यानंतर त्यांना जेडीयूमधून निलंबित करण्यात आले होते. हेच कारण आहे की विरोधी पक्ष नितीश सरकारला सतत लक्ष्य करत आहेत. तेजस्वी यादव सतत मेवालाल यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. तारापूरचे जेडीयूचे नवनिर्वाचित आमदार डॉ. मेवालालाल चौधरी यांना पहिल्यांदाच मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे.

वादाच्या भोवऱ्यात सापडलेले शिक्षणमंत्री डॉ. मेवालालाल चौधरी यांनी आजच कार्यभार स्वीकारला होता. या दरम्यान ते म्हणाले की, जे लोक आपल्याविरूद्ध बोलत आहेत व माझ्या पत्नीच्या मृत्यूला मी जबाबदार असल्याचे म्हणत आहेत त्यांच्याविरुध्द 50 कोटीचा मानहानीचा गुन्हा दाखल केला जाईल आणि आजच त्यांना कायदेशीर नोटीस मिळेल. परंतु आता संध्याकाळपर्यंत त्यांनी राजीनामा देऊन सर्वांना चकित केले आहे.