Bihar Assembly Election Result 2020: बिहार विधानसभा निवडणूक निकाल, आज सकाळी 8 वाजलेपासून मतमोजणीस सुरुवात, नीतीश कुमार, तेजस्वी यादव यांच्या कामगिरीबाबत उत्सुकता

सर्व मतमोजणी केंद्रांवर चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. सकाळी 8 वाजलेपासून मतमोजणीस सुरुवात होत आहे.

Bihar Election Results 2020 (Photo Credit - File Photo)

बिहार विधानसा निवडणूक निकाल 2020 (Bihar Assembly Election Results 2020) आज (10 नोव्हेंबर) जाहीर होत आहे. आज सकाळी 8 वाजलेपासून मतमोजणीस सुरुवात होईल. मतमोजणी झाल्यानंतर उमेदवारांची विजय, पराजय जाहीर होणार आहे. विधानसभेच्या एकूण 243 जागांसाठी तीन टप्प्यांमध्ये झालेल्या मतदानाची आज मतमोजणी पार पडत आहे. आजच्या निकालामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी, नीतीश कुमार ( Nitish Kumar), तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) , राहुल गांधी (Rahul Gandhi), चिराग पासवान (Chirag Paswan) आणि सुशील कुमार मोदी (Sushil Kumar Modi), जितन राम मांझी (Jitan Ram Manjhi) यांच्यासह पप्पू यादव यांच्याही कामगिरीचे मुल्यमापन होणार आहे. बिहारची जनता काय आणि कोणाला बहुमत देते याबाबत उत्सुकता आहे.

मतमोजणीसाठी बिहारमधील एकूण 38 जिल्ह्यांत 55 मतमोजणी केंद्र उभारण्यात आली आहेत. सर्व मतमोजणी केंद्रांवर चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. सकाळी 8 वाजलेपासून मतमोजणीस सुरुवात होत असली तरी, सकाळी 10 वाजेपर्यंत जय-पराजयाचे चित्र बऱ्यापैकी स्पष्ट होऊ शकणार आहे. सुरुवातील पोस्टल बॅलेट मतमोजणी होणार आहे.

बिहार राज्यासाठी आजचा दिवस अत्यंत महत्वपूर्ण आहे. आज येणाऱ्या निकालावरुन पूढची पाच वर्षे बिहारची सत्ता कोणाच्या ताब्यात हे ठरणार आहे. मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली भाजप प्रणीत एनडीएने जोरदार प्रचार केला. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अनेक केंद्रीय मंत्री बिहारमध्ये उतरले होते. दुसऱ्या बाजूला विरोधात असलेल्या तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस प्रणीत युपीपएने जोरदार प्रचार केला. युपीएच्या वतीने तेजस्वी यादव यांच्यासोबतच राहुल गांधी आणि इतर अनेक नेते प्रचारात सक्रीय दिसत होते.

नीतीश कुमार यांनी शेवटच्या क्षणी आपली ही शेवटची निवडणूक आहे असे सांगून वातावरण भावनिक केले होते. तर, दुसऱ्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या प्रचारसभांमधून लालू प्रसाद यादव यांच्या काळात 15 वर्षांपूर्वी बिहारमध्ये काय झाले हे सांगत होते. त्याउलट तेजस्वी यादव यांनी 10 लाख सरकारी नोकऱ्या आणि सुशासन असा डाव फेकत प्रचाराचा केंद्रबिंदू स्वत:कडे खेचून घेतला. त्याला राहुल गांधी यांनीही साथ दिली. त्यामुळे सामना अटीतटीचा झाला.