Attack Lesbian Couple: क्रूरतेचा कळस! 'लेस्बियन कपल'वर तरुणांचा हल्ला; केली मारहाण, प्रायव्हेट पार्टसमध्ये घुसवले गरम रॉड

या घटनेनंतर दोन्ही महिलांना सागरदिघी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि आठवडाभरानंतर त्यांना घरी सोडण्यात आले.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) 2 लेस्बियन (Lesbian) महिलांचा क्रूरपणे छळ केल्याची घटना समोर आली आहे. पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील जंगीपूर उपविभागातील सागरदिघी शहरातील ही घटना आहे. साहेबुल शेख, कदम मुल्ला आणि समीर अशी आरोपींची नावे आहेत. मुल्ला आणि समीर हे पीडितांचे नातेवाईक असल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना 25 ऑक्टोबर रोजी रात्री 11 च्या सुमारास घडली.

कथितरित्या, तिन्ही आरोपी पिडीत महिलांच्या घरात घुसले आणि त्यांना त्या एकाच बेडवर एकत्र का झोपल्या आहेत, अशी विचारणा करू लागले. यानंतर तिन्ही आरोपींनी दोन्ही महिलांवर अत्याचार केले, यासह दोघींच्या प्रायव्हेट पार्टसमध्ये लोखंडी रॉडही घुसवले. घटनेच्या वेळी आरोपींनी महिलांना नग्न करून त्यांच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या अंगावर अॅसिडही शिंपडले.

हा संपूर्ण प्रकार घडल्यानंतर त्यांनी महिलांना धमकी दिली की, या सर्व गोष्टी कुणाला सांगितल्या तर त्या लेस्बियन असण्याचे वास्तव सर्वांना सांगितले जाईल. या घटनेनंतर दोन्ही महिलांना सागरदिघी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि आठवडाभरानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. घडल्या प्रकारची माहिती मिळताच पीडितेच्या आजीने याप्रकरणी तक्रार दाखल केली. याप्रकरणी मालदा पोलिसांनी साहेबुल शेखला अटक केली आहे. त्याला 7 नोव्हेंबर रोजी न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. (हेही वाचा: Horror Videos Addiction: जादूटोणा आणि भयपट पाहण्याच्या व्यसनातून तरुणाने केली आईची हत्या, भोपाळ येथील घटना)

पोलिसांसमोर दोन्ही महिलांनी आपण समलैंगिक असल्याची कबुली दिली. त्या म्हणाल्या, ‘आम्ही रिलेशनशिपमध्ये आहोत आणि हे करण्यापासून आम्हाला कोणीही रोखू शकत नाही. त्या दिवशी तिघांनी आमचा विनयभंग केला. आम्हाला अयोग्यरित्या स्पर्श केला, आमच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला.’ पिडीत महिला 20 आणि 24 वर्षांच्या आहेत. त्या दोघीही शेतकरी कुटुंबातील आहेत. या महिला समलैंगिक असल्याचे समजल्यानंतर आरोपींचा त्यांच्यावर बलात्कार करण्याच्या हेतू असल्याचे तपासकर्त्यांचे मत आहे.