Anna Hazare Writes to CM Kejriwal: 'AAP सत्तेच्या नशेत बुडाली', अण्णा हजारे यांची अरविंद केजरीवाल यांच्यावर पत्राद्वारे टीका

दिल्लीत निर्माण झालेल्या उत्पादन शुल्क धोरणाच्या वादावरुन अण्णांनी हे पत्र केजरीवाल यांना लिहीले आहे.

Anna Hazare and Arvind Kejriwal | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांना पत्र लिहीले आहे. दिल्लीत निर्माण झालेल्या उत्पादन शुल्क धोरणाच्या वादावरुन अण्णांनी हे पत्र केजरीवाल यांना लिहीले आहे. या पत्रात (Anna Hazare Writes to CM Arvind Kejriwal) केजरीवाल यांच्या एकूणच कारभार आणि आम आदमी पक्षाच्या धोरणावर टीका केली आहे. अण्णांनी म्हटले आहे की, आम आदमी पार्टी सत्तेच्या नशेत धुंद झाली आहे. त्यामुळे आम आदमी पार्टी (AAP) ची निर्मिती करणाऱ्या चळवळीची विचारधारा आणि मूल्ये विसरली आहे. अण्णांच्या मते दिल्लीचे मुख्यमंत्री झाल्यानंतर केजरीवाल यांची विचारधारा संपुष्टात आली आहे.

अण्णा हजारे यांनी केजरीवाल यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, तुम्ही मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच मी तुम्हाला पत्र लिहित आहे. दारु घोटाळ्याबाबत दिल्ली सरकारच्या नुकत्याच आलेल्या बातम्या निराशाजनक आहेत. मी गांधीजी आणि त्यांच्या विचारसरणीपासून प्रेरित झालो आहे. या आधारे मी, माझे जीवन लोकांसाठी, समाजासाठी आणि देशासाठी समर्पित केले आहे. गेली 47 वर्षे मी समाजाच्या उन्नतीसाठी आणि भ्रष्टाचारासाठी काम करत आहे. (हेही वाचा, Anna Hazare on Lokayukta Law: लोकायुक्त कायदा करा, नाहीतर राजीनामा द्या; अण्णा हजारे यांचा ठाकरे सरकारला आंदोलनाचा इशारा)

केजरीवाल यांना संबोधून अण्णा पुढे पत्रात म्हणतात, आपण आपल्या 'स्वराज' पुस्तकात आदर्शांबद्दल लिहिलं आहे. त्यामुळे आपणाकडून खूप आशा होत्या, पण राजकारणात गेल्यावर आणि मुख्यमंत्री झाल्यावर तुम्ही विचारसरणीला विसरलात. जशी दारुची नशा असते तसे तुम्ही सत्तेच्या नशेत बुडाला आहात.

दरम्यान, अण्णा हजारे यांनी दिल्लीच्या नवीन उत्पादन शुल्क धोरणाचाही निषेध केला आहे. ज्या धोरणातून दारूच्या विक्री आणि सेवनाला प्रोत्साहन दिले जात आहे असे अण्णांना वाटते. शहराच्या कानाकोपऱ्यात दारूची दुकाने उघडली जात आहेत आणि सर्वसामान्यांसाठी ते अत्यंत वाईट आहे, असेही अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.