Andhra Shocker: कोरोनाच्या भीतीने तब्बल 2 वर्षापासून दोन महिला घरात कैद; 'अशी' झाली सुटला
मणि आणि त्यांची मुलगी दुर्गा भवानी या दोघींनी 2020 मध्ये कोविडच्या कहरानंतर स्वतःला घराच्या चार भिंतींमध्ये कोंडून घेतले.
जगात पुन्हा एकदा कोरोनाचे (Coronavirus) रुग्ण वाढू लागले आहेत. चीनमध्ये तर कोरोनाची त्सुनामी पाहायला मिळत आहे. चीनमधील व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रस्त्यावर मृतदेहांचा ढीग दिसत आहे. सध्या भारतात रुग्ण कमी असले तरी, आरोग्य मंत्रालयाने अॅडव्हायजरी जारी केले आहे. अशात आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) काकीनाडा (Kakinada) जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे दोन महिलांनी कोविड-19 ची लागण होण्याच्या भीतीने दोन वर्षे स्वत:ला घरात कैद करून घेतले होते.
ही धक्कादायक घटना काकीनाडा येथील कुयेरू (Kuyyeru) गावातील आहे. कुटुंबप्रमुखाने आई आणि मुलीची प्रकृती खालावल्याची माहिती अधिकाऱ्यांना दिली, त्यानंतर दोघींनाही काकीनाडा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. जेव्हा आरोग्य कर्मचारी या महिलांना घरातून बाहेर काढण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले तेव्हा महिलांनी खोलीचा दरवाजा उघडण्यास नकार दिला. यानंतर कसेतरी महिला आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्यांना समजावले व दार उघडले गेले.
त्यानंतर दोघींनाही जबरदस्तीने रुग्णालयात नेण्यात आले. दोन्ही महिला मानसिक आजारी असल्याचा संशय असल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले. मणि आणि त्यांची मुलगी दुर्गा भवानी या दोघींनी 2020 मध्ये कोविडच्या कहरानंतर स्वतःला घराच्या चार भिंतींमध्ये कोंडून घेतले. कोरोनाचा प्रादुर्भाव नंतर आटोक्यात आला तरी, या आई-मुलीने स्वत:ला समाजापासून वेगळे ठेवले. मणीचा नवरा तिला खायला-प्यायला देत होता, पण गेल्या एक आठवड्यापासून तिने त्याला आपल्या खोलीत येऊ दिले नाही. (हेही वाचा: यूएस, चीनमध्ये कोविड प्रकरणांमध्ये वाढ; केंद्राने जारी केली अॅडव्हायजरी, पॉझिटिव्ह रिपोर्ट्सचे Genome Sequencing वाढवण्याचा सुचना)
महिलेची प्रकृती खालावल्याने तिच्या पतीने डुग्गुडुरू प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. सुप्रिया यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर त्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना घरी पाठवले. मात्र आई-मुलीने दरवाजा न उघडल्याने आरोग्य अधिकाऱ्यांनी, गोलपालमचे उपनिरीक्षक तुलसीराम आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांची मदत घेत महिलेच्या घरी जाऊन तिला समजावले. त्यानंतर दोघींनाही सायंकाळी काकीनाडा शासकीय सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले, तेथे त्यांच्यावर उपचार व मानसिक समुपदेशन करण्यात येत आहे.