Amazon & Flipkart च्या सेवा 'या' अटीवर होणार सुरु; जीवनावश्यक वस्तू सोडूनही करता येणार खरेदी
केवळ ग्रीन (Green Zone) आणि ऑरेंज झोन (Orange Zone) मध्येच काम करता येईल तर रेड झोन मध्ये असणाऱ्या ठिकाणी केवळ अत्यावश्यक वस्तूंची डिलिव्हरीच होणार आहे.
देशातील कोरोना व्हायरस (Coronavirus) बाधितांची संख्या वाढत असताना खबरदारीचा पर्याय म्ह्णून केंद्र सरकारने पुन्हा एकदा लॉकडाउन वाढवले आहे. अजून दोन आठवड्यांसाठी लॉक डाऊन (Lockdown) चा कालावधी वाढवण्यात आला आहे. त्यानुसार लॉकडाउनचा तिसरा टप्पा 4 मे ते 17 मेपर्यंत असेल. याकाळात अनेक उद्योग व व्यवसायांना सूट देण्यात येणार आहे. अॅमझॉन (Amazon) आणि फ्लिपकार्ट (Flipkart) यांसारख्या ई-कॉमर्स कंपन्याना सुद्धा याचा लाभ होणार आहे. या कंपन्यांना यापुढे जीवनावश्यक वस्तू सोडूनही अन्य वस्तूंची डिलिव्हरी करता येणार आहे. मात्र यासाठी त्यांना एका अटींचे पालन करावे लागणार आहे. ही अट म्हणजे या कंपन्यांना केवळ ग्रीन (Green Zone) आणि ऑरेंज झोन (Orange Zone) मध्येच काम करता येईल तर रेड झोन मध्ये असणाऱ्या ठिकाणी केवळ अत्यावश्यक वस्तूंची डिलिव्हरीच होणार आहे.
4 मेपासून ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरुन स्मार्टफोन, लॅपटॉप, AC,फ्रिज, कंप्यूटर हार्डवेअर या सहित अनेक अत्यावश्यक नसलेल्या पण हव्या असणाऱ्या सर्व वस्तू खरेदी करता येणार आहेत. Lockdown: लॉकडाऊन काळात घरी जाण्यासाठी गृहमंत्रालयाची नियमावली; पाहा कसा करायचा अर्ज?
दरम्यान, ग्रीन आणि रेड झोनमध्ये ओला, उबेरसह खासगी टॅक्सी वाहतुकीस परवानगी देण्यात आली आहे. मात्र चालकासह केवळ 2 जणांनाच प्रवास करता येईल असा नियम आहे. ग्रीन झोनमधील दारूची दुकानं आणि पान शॉप्स सुरू ठेवण्याचा विचारही सरकार करत आहे. दुसरीकडे रेल्वे सेवा, हवाई वाहतूक, मेट्रो आणि सार्वजनिक वाहतूक, सर्व शैक्षणिक संस्था, शाळा, कॉलेज, मॉल, सिनेमा हॉल, स्पोर्ट्स क्लब सर्व काही 17 मे पर्यंत बंद राहणार आहे.