जम्मू काश्मीर: CRPF कँपवर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी, चकमक सुरुच
दहशतवाद्यांनी SOG आणि CRPF कँपला लक्ष्य बनवले. हल्ला होताच भारतीय जवानांनीही त्याला तोडीस तोड प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली.
अवघा भारत प्रजासत्ताक दिन (Republic Day) साजरा करत असताना भारताचे अभिन्न अंग असलेल्या जम्मू काश्मीरमध्ये (J&K) मात्र दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. दहशतवाद्यांनी CRPF कँपवर हल्ला केला. या हल्ल्याला भारतीय लष्करानेही तोडीस तोड उत्तर दिले. चकमक अद्यापही सुरु आहे. मात्र, या चकमकीत 5 भारतीय जवान जखमी झाल्याचे वृत्त आहे. दहशतवाद्यांनी काश्मीरच्या पर्वतीय प्रदेशातील पुलवामा येथील पंपोर आणि खानमो परिसरात शनिवारी पहाटे हल्ला केला. दहशतवाद्यांनी SOG आणि CRPF कँपला लक्ष्य बनवले. हल्ला होताच भारतीय जवानांनीही त्याला तोडीस तोड प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली.
लष्कारच्या जवानांनी मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम हाती घेतली आहे. आतापर्यंत दहशतवादी मारल्याचे किंवा सापडल्याचे वृत्त नाही. मात्र, जवानांनी दहशतवादी लपून बसलेल्या ठिकाणाला वेढा घातला आहे. दरम्यान, या आधी गुरुवारी पाकिस्तानने पुंछ, राजोरी सेक्टर आणि सुंदरबनी या परिसरासह लाईन ऑफ कंट्रोल (LoC) जवळ चार ठिकाणी शस्त्रसंधिचे उल्लंघन केले. या ठिकाणी त्यांनी हलक्या शस्त्रांनी गोळीबार केला. तसेच मोटार माध्यमातून काही तोफांचा मारा केला. भारतीय जवानाने पाकिस्तानची ही नापाक हरकत उधळून लावली. (हेही वाचा, 70th Republic Day of India: Doodle च्या माध्यमातून Google ने साजरा केला भारताचा प्रजासत्ताक दिन)
जम्मू काश्मीरमध्ये भारतीय सीमेवर बर्फ साचले आहे. त्यामुळे इथे नैसर्गिक मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक बदल पाहायला मिळत आहे. असे असतानाही पाकिस्तानने आपली नापाक हरकत कायम ठेवत घुसखोरी आणि शस्त्रसंधिचे उल्लंघन कायम ठेवले आहे. पाकिस्तानी सैन्याने बुधवारी रात्री पुंछ जिल्ह्यातील मेंढर सेक्टर येथील अग्रिम चौकीवर गोळीबार केला. पाकच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराने दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन ऑल आऊट सुरु केले आहे. या मोहिमेखाली केलेल्या कारवाईत अनेक दहशतवाद्यांना टीपण्यात भारतीय सैनिकांना यश आले आहे.