IPL Auction 2025 Live

7th Pay Commission Latest News Update: पेन्शनधारकांसाठी महागाई सवलतीबाबत केंद्र सरकारने जारी केले स्पष्टीकरण; जाणून घ्या सविस्तर

7 व्या वेतन आयोगानुसार (7th CPC), केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांसाठी सध्याचा DR दर 38% आहे, जो कम्युटेशनपूर्वी मूळ पेन्शनवर मोजला जातो.

Representational Image (Photo Credits: PTI)

केंद्र सरकारच्या (Central Government) पेन्शनधारकांसाठी (Pensioners) महागाई सवलत (DR) बाबत स्पष्टीकरण जारी करण्यात आले आहे. कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाच्या अंतर्गत निवृत्ती वेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाने केंद्र सरकारच्या सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना दिल्या जाणार्‍या DR लाभाबाबत हे स्पष्टीकरण दिले आहे व म्हटले आहे की, कम्युटेशनपूर्वी मूळ पेन्शनवर महागाई सवलत देय आहे. केंद्र सरकारकडून निवेदन प्रसिद्ध झाल्यानंतर पेन्शनधारकांच्या मनात असलेल्या शंकांचे निरसन झाले आहे.

महागाई सवलत ही मूळ पेन्शनवर देय आहे की कम्युटेशननंतर कमी झालेल्या पेन्शनवर, याबाबत स्पष्टीकरण मागण्यात आले होते. केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की, निवृत्तीवेतनधारकांना डीआरचा लाभ हा कम्युटेशनपूर्वी मूळ पेन्शनवर देय मानला जातो, तो वेतन आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबजावणीवर सुधारित केलेल्या कम्युटेड पेन्शनच्या कपातीनंतर कमी झालेल्या पेन्शनवर नाही.

सीसीएस (CCS-पेन्शन) नियम 2021 च्या नियम 52 नुसार, केंद्र सरकारचे कर्मचारी आणि कौटुंबिक निवृत्ती वेतन लाभार्थ्यांना महागाईच्या आधारावर DR सवलत दिली जाते. नियम 41 अंतर्गत अनुकंपा भत्ता प्राप्त करणार्‍यांना देखील लाभ दिला जातो. महागाई सवलत आणि महागाई भत्ता दोन्ही लाभ हे सहामाही आणि चक्रवाढ मिळून देय आहेत. विद्यमान केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांना DA दिला जातो तर DR पेन्शनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतन लाभार्थ्यांना दिला जातो. (हेही वाचा: India Post Recruitment 2022: भारतीय टपाल विभागात 188 पदांसाठी भरती; परीक्षा आणि मुलाखतीशिवाय होणार निवड)

7 व्या वेतन आयोगानुसार (7th CPC), केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांसाठी सध्याचा DR दर 38% आहे, जो कम्युटेशनपूर्वी मूळ पेन्शनवर मोजला जातो. केंद्र सरकारने DA आणि DR मध्ये 4% वाढ जाहीर केल्यानंतर, 1 जुलै 2022 पासून 38 टक्के DR दर लागू होईल.