मुंबई विमानतळावर तैनात असलेल्या हेड कॉन्स्टेबलची कोरोना व्हायरसची चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याची माहिती समोर आली आहे. तर गेल्या काही दिवसांपासून या कॉन्स्टेबलवर मुंबईतील रुग्णालात उपचार सुरु असल्याचे सीआयएसएफ यांनी सांगितले आहे.
कोरोना व्हायरमुळे सर्वत्र लॉकडाउनची परिस्थिती आहे. याच कारणास्तव वकिल आणि सामाजिक कार्यकर्ते अमित सहानी यांनी सुप्रीम कोर्टात बेघरांच्या हक्कांसाठी याचिका दाखल केली आहे.
बॉलिवुड अभिनेता वरूण धवन याच्याकडून मुख्यमंत्री निधीस 25 लाखांची आर्थिक मदत करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून वरूण धवनचे आभार मानण्यात आले आहेत.
दिल्लीमध्ये आजपासून 1 हजार दुकानात मोफत किराना मिळणार आहे. यासंदर्भात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी माहिती दिली आहे. पुढील दोन-तीन दिवसांत इतर दुकानांमध्येदेखील ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे.
बॉलिवुड अभिनेता अक्षय कुमारकडून पंतप्रधान निधीस 25 कोटी रुपये मदत केली आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अक्षय कुमार यानेचे ट्विट रिट्विट करत जनतेला मदतीचं आवाहन केलं आहे. देशाच्या सुरक्षितेसाठी प्रत्येकाने आपल्या बचतीतून कोरोनाचं संकट टाळण्याचा प्रयत्न करावा, असंही मोदींनी म्हटलं आहे.
कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी टाटा ट्रस्टकडून केंद्र सरकारला तब्बल 500 कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर टाटा ट्रस्टने दिलेली ही सर्वात मोठी मदत आहे.
कोरोना व्हायरसच्या भीतीने गावी परतणाऱ्या कुटुंबाच्या दुचाकील अपघात झाला आहे. या अपघातात पती-पत्नीसह 6 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. ही घटना कराडजवळ घडली. अपघातात मृत्यू झालेले कुटुंबीय हे कोल्हापूर येथील शाहूवाडी तालुक्यातील जांबूर गावातील रहिवासी असल्याचे समजते.
महाराष्ट्र: मध्य प्रदेशातील मूळ गावी फुकटात सोडण्याचे आश्वासन दिल्यानंतर ट्रक चालक त्यांच्याकडून 100 रुपये शुल्क आकारतात असा आरोप नागपुरातील स्थलांतरित कामगारांच्या एका गटाने केला आहे.
राज्य आणि देश पातळीवरील कोरोना व्हायरस संकटाविरोधातील लढा आता अधिक तीव्र झाला आहे. केंद्र आणि राज्या सरकारसोबतच देशातील स्वायत्त संस्थाही या लढ्या विरोधात उभ्या राहू लागल्या आहेत. त्यामध्ये मग रिझरव्ह बँक ऑफ इंडिया असो, देशातील न्यायव्यवस्था असो की भारतीय निवडणूक आयोग असो. या सर्वच स्वयत्त संस्था कोरोना विरोधातील लढ्यात उतरल्या आहेत. या लढ्याचाच एक भाग झालेल्या न्यायसंस्थेने अत्यावश्यक वगळता सर्व सुनावण्या टाळल्या आहेत. निवडणूक आयोगाने आपला निवडणूक कार्यक्रम स्थगित केला आहे किंवा पुढे ढकलला आहे. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी कालच पत्रकार परिषद घेऊन घसघशीत दरकपात केली.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्ष आणि महाविकास आघाडी प्रणेते शरद पवार यांनीही राज्यातील जनतेला विशेष संदेश दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिथे असाल तेथेच राहा. गावी जायचा अथवा प्रवास करायचा विचार करु नका. पुढचे काही दिवस हे कोरोनाविरोधातील लढाई लढण्याचे आहेत. हे दिवस आपल्यासाठी अत्यंत कसोटीचे आहेत, असे सांगितले आहे. तर, शरद पवार यांनीहीह राज्यातील जनतेला काही संदेश दिला आहे आणि राज्य सरकारला विशेष सूचना केल्या आहेत.
'नीट', 'जेईई' परीक्षाही लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. देशातील एमबीबीएस तसेच इतर वैद्यकीय शाखांच्या प्रवेशासाठी 'नीट' परीक्षा घेतली जाते. ही परिक्षा 3 मे या दिवशी होणार होती. मात्र, कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर ही परिक्षा आता लांबणीवर टाकण्यात आली आहे. 'नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट' (नीट) ही परीक्षा एनटीए म्हणजेच राष्ट्रीय मूल्यमापन संस्थेद्वारा घेतली जाते. ही परीक्षा आता मे महिना अखेरीस होऊ शकते, असा अंदाज आहे. (हेही वाचा, मुंबईमध्ये आज कोरोना व्हायरसचे 9 रुग्ण आढळले; राज्यातील एकूण Coronavirus रुग्णांची संख्या 153 वर)
दरम्यान, कोरोना व्हायरस संकटाचा मुकाबला करण्यासाठी आता राज्यातील मानसोबचार तज्ज्ञही सज्ज झाले आहेत. कोरोना व्हायर संकटाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेली संचारबंदी, लॉकडाऊन आदींमुळे नागरिकांना घरातच बसून राहावे लागत आहे. याचा नागरिकांच्या मानसिक स्वस्थ्यावर त्याचा प्रचंड परिणाम होऊ शकतो. त्यामुळे त्यांना मानसिक उपचारांची प्रचंड आवश्यकता आहे. हे विचारात घेऊन राज्यातील मानसोपचार तज्ज्ञांनी दूरध्वनीद्वारे विनामूल्य समुपदेशन करण्याचा पर्याय निवडला आहे. दूरध्वनीद्वारे समुपदेशन ही सेवा येत्या 14 एप्रिलपर्यंत कार्यरत राहणार आहे. कोरोना व्हायरस संकट त्याविरोधात करण्यात आलेली उपाययोजना आणि इतर ताज्या बातम्यांसाठी लेटेस्टली मराठी लाईव्ह ब्लॉग सोबत जोडलेले राहा.