लवकरच होणार मुंबईतील मध्यवर्ती कामाठीपुरा येथील इमारतींचा पुनर्विकास; 11 फेब्रुवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा (Delhi Vidhansabha Elections) बहुप्रतीक्षित निकालाचा दिवस आहे, आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचण्यासाठी 'लेटेस्टली मराठी' ला अवश्य भेट द्या.

12 Feb, 04:13 (IST)

मुंबईतील मध्यवर्ती ठिकाणी वसलेल्या कामाठीपुरा येथील इमारतींचा समूह पुनर्विकासाचा प्रस्ताव तयार करून, सर्वेक्षणाला सुरुवात करण्याचे गृहनिर्माण मंत्री यांचे मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळास आदेश दिले आहेत 

12 Feb, 03:25 (IST)

रोहित पवार यांच्याविरुद्ध राम शिंदे यांनी याचिका दाखल केली होती. पवार यांच्या निवडीला थेट आव्हान दिले गेले आहे. याबाबत उच्च न्यायालयाने रोहित पवार यांना समन्स बजावून कोर्टात बाजू मांडण्याचे आदेश दिले आहेत. मात्र रोहित पवार यांनी आमच्यापर्यंत समन्स पोहचले नसल्याचे सांगितले आहे. 

12 Feb, 02:39 (IST)

सोलापूर-तुळजापूर मार्गावर तामलवाडी टोलनाक्याजवळ सिलेंडर वाहून नेणाऱ्या तीन ट्रकला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. हा स्फोट इतका मोठा आहे की पोलिसांनी आजूबाजूचा रहिवासी भाग रिकामा केला आहे. तीन ट्रकमध्ये मिळून 580 सिलेंडर्स आहेत. यापैकी 15 सिलेंडर्सचा स्फोट झाला आहे.

12 Feb, 02:06 (IST)

नाशिक शहरात एका 60 वर्षीय बेपत्ता महिलेचा मृतदेह गोणीत बांधलेल्या अवस्थेत  आढळून आला आहे. या घटनेमुळे नाशिक शहरात एकच खळबळ उडाली आहे. मंदाकिनी पाटील असं या मृत महिलेचं नाव आहे.

 

12 Feb, 01:59 (IST)

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून केजरीवाल आणि आम आदमी पक्षाला शुभेच्छा दिल्या आहेत. काँग्रेसला पुन्हा एकदा दिल्ली विधानसभेत मोठा धक्का बसला आहे. यंदा काँग्रेसला दिल्ली विधानसभा निवडणुकीत एकही जागा मिळवता आलेली नाही.

12 Feb, 01:49 (IST)

उस्मानाबाद-सोलापूर महामार्गावर तामलवाडीजवळ गॅस टँकरने पेट घेतल्याने एकामागून एक सिलेंडरचे स्फोट झाले आहेत. आज सायंकाळी साडेसहा वाजता ही घटना घडली. या घटनेनंततर खबरदारीचा उपाय म्हणून तामलवाडीची काही घरे रिकामी करण्यात आली आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी नाही. या घटनेमुळे उस्मानाबाद-सोलापूर महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक थांबवण्यात आली आहे. या घटनेमुळे तामलवाडी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

 

12 Feb, 01:08 (IST)

पुण्याकडून लोणावळ्याकडे भरधाव वेगात जाणाऱ्या लोकल रेल्वेच्या धडकेत एका मूकबधिर महिलेचा मृत्यू झाला आहे. कान्हे येथे रेल्वे रूळ ओलांडताना ही घटना घडली. रेखा प्रकाश शेलार असे या मृत महिलेचं नाव आहे. 

12 Feb, 24:57 (IST)

किर्तनाच्या विशिष्ट शैलीमुळे महाराष्ट्रात चर्चेत असलेले इंदोरीकर महाराज त्यांच्या एका वक्तव्यामुळे अडचणीत सापडले आहेत. त्यांनी आपल्या एका किर्तनामध्ये लोकांना गर्भलिंगाविषयीचा ऑड-इव्हन फॉर्म्युला सांगितला आहे. सम संख्येला संभोग केल्यास मुलगा जन्माला येईल. तर विषम तारखेला संबंध आल्यास मुलगी जन्माला येईल, असं इंदोरीकरांनी आपल्या किर्तनात म्हटलं आहे. या प्रकरणी त्यांना नोटीसही बजावण्यात आली आहे. त्यामुळे आता इंदोरीकर यांच्यावर गुन्हा दाखल होणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

 

12 Feb, 24:48 (IST)

सोलापूर शहरासाठी उजनी धरणातून भीमा नदीत विसर्गाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सर्तकतेच्या इशारा दिला आहे.  

 

12 Feb, 24:10 (IST)

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदन केले आहे. नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून  दिल्ली विधानसभा निवडणुकीतील विजयासाठी आणि दिल्लीकरांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

 

12 Feb, 24:05 (IST)

रोहित पवार यांना मुंबई उच्च न्यायालयाने समन्स बजावले आहे. माजी आमदार राम शिंदे यांनी यासंदर्भात उच्च न्यायालयात तक्रार केली आहे. विधानसभा निवडणुकीत मतदारांना पैसे देऊन मत मिळवली होती, असा आरोप राम शिंदे यांनी केला आहे.   

 

11 Feb, 23:55 (IST)

दिल्लीतील जनतेने दिलेल्या जनादेशाचा आम्ही स्वीकार करतो. आता दिल्लीमध्ये भाजपा विरोधी पक्षाची भूमिका बजावेल, अशा शब्दांत भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. तसेच केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पक्ष दिल्लीचा अधिक गतीने विकास करील, असा विश्वास व्यक्त करत नड्डा यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदन केले आहे.

 

11 Feb, 22:20 (IST)

राज्यसभेत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी महसूल संकलनात सातत्याने सुधारणा होत असल्याचा दावा केला आहे. देशभरात जानेवारी महिन्यात 1 लाख 10 हजार कोटी जमा झाले आहेत. तर एप्रिल 2019 ते जानेवारी 2020 दरम्यान जीएसटीने वसूल केलेला एकूण महसूल 6 पटपेक्षा अधिक असून त्याची रक्कम 1 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे असेही सीतारामन म्हणाल्या. आज अर्थसंकल्प अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्याच्या सरतेशेवटी दोन्ही सभागृहात झालेल्या चर्चांवर त्या बोलत होत्या.

11 Feb, 20:57 (IST)

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आप आणि अरविंद केजरीवाल यांना विजयाच्या शुभेच्छा देताना भाजपवर निशाणा साधला आहे. दिल्ली वासियांनी जन की बात ऐकली तिथे मन की बात चालली नाही, भाजपने केजरीवाल यांना दहशतवादी ठरवले पण त्यानीच भाजप चा पराभव केला असे उद्धव ठाकरे यांनी म्हंटले आहे.

11 Feb, 20:50 (IST)

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मागील वर्षांची तुलना केल्यास आम आदमी पक्ष हा अधोगतीच्या वाटेवर आहे तर काँग्रेस हे पूर्णतः संपुष्टात आले आहे मात्र त्याच वेळी भाजप हे प्रगतीपथावर असल्याची प्रतिक्रिया भाजप नेते आशिष शेलार यांनी दिली आहे. 

11 Feb, 20:19 (IST)

दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत काँग्रेसच्या  पराभवावर भाष्य केले आहे. काँग्रेसतर्फे प्रचार कमी पडला असे म्हणताना राहुल गांधी यांच्या भूमिकेवरही पवार यांनी निशाणा साधला. काही दिवसांपूर्वी राहुल यांनी नरेंद्र मोदी यांना दांडा मारण्याची भाषा केली होती अशी विधाने करू नयेत असा सल्ला सुद्धा पवारांनी राहुल यांना दिला आहे. 

11 Feb, 20:12 (IST)

दिल्ली विधानसभेच्या निवडणूक निकालाच्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. अरविंद केजरीवाल यांना शुभेच्छा देत, या निकालाचे काही आश्चर्य वाटत नाही,लोकांनी मोदी आणि शाह यांच्या अहंकार व दहशतवादाच्या विरोधात मते दिली आहेत. लागोपाठ पाचव्या राज्यात सत्ता गेल्यावर आता भाजपच्या पराभवाची मालिका सुरु झाली आहे, आणि आता ही मालिका संपणार नाही असा दावा सुद्धा पवार यांनी केला आहे. 

11 Feb, 19:51 (IST)

झारखंड विकास मोर्चा पक्षाचे अध्यक्ष बाबुलाल मरांडी यांनी आपला पक्ष भाजपमध्ये विलीन होणार असल्याची अधिकृत घोषणा केली आहे. येत्या 17 फेब्रुवारीला हे विलिनिकरण होईल असे पीटीआयच्या वृत्तानुसार समोर येत आहे.

11 Feb, 19:44 (IST)

दिल्ली विधानसभेचे कल 'आप'च्या बाजूने पूर्ण झुकलेले असतानाही महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अजूनही पूर्ण निकाल हाती येणे शिल्लक आहे असा आशावाद व्यक्त केला आहे. तसेच, "दिल्ली मध्ये मॅच फिक्सिंग करून भाजपला एकटं पडण्याचा प्रयत्न गेला आहे, किंबहुना देशातील विरोधी पक्ष एकत्र येऊन केवळ भाजपला विरोध करण्यासाठी वाट्टेल ती  तडजोड करायला तयार आहेत  या सगळ्यांनी हिंमत असेल तर एकट्याने लढून जिंकून दाखवावं" असे आव्हान चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. 

11 Feb, 19:35 (IST)

दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु असतानाच शरद पवार यांनी अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Read more


आज दिल्ली विधानसभा निवडणुकीचा (Delhi Vidhansabha Elections) बहुप्रतीक्षित निकालाचा दिवस आहे, भाजप (BJP) विरुद्द आप (AAP) अशा सामन्यात आज मतमोजणीनुसार निकालाचे आकडे समोर येताच दिल्लीत कोणाची जागा कायम राहते हे समजणार आहे. सर्वच एक्झिट पोलमध्ये आम आदमी पक्षाला बहुमत मिळताना दिसत असलं तरी भाजपला मात्र दिल्लीत आपणच सत्तेवर येऊ असं वाटत आहे.

भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी एक्झिट पोलचे सर्व अंदाज खोटे ठरतील. भाजपला 48 जागा मिळणार असल्याचा सुद्धा दावा केला आहे. तर पश्चिम दिल्लीचे भाजप खासदार परवेश वर्मा यांनीही भाजपला 50 जागा मिळतील, तर आम आदमी पार्टीला 16 आणि काँग्रेसला अवघ्या चार जागा मिळतील असे देखील भाकीत वर्तवले आहे. आज 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होताच हे अंदाज कितपत खरे ठरतात हे समोर येणार आहे.

आज राज्यसभेत अधिवेशन होणार असून, यामध्ये काही महत्वपूर्ण विधायकांवर चर्चा होणार असल्याचे समजतेय. या अधिवेशनाच्या आधी काल भाजपकडून सर्व सभागृहातील सर्व खासदारांना पत्र पाठवून उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले होते.

आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचण्यासाठी 'लेटेस्टली मराठी' ला अवश्य भेट द्या.

दुसरीकडे महाराष्ट्रात पंढरपूर-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील सुपली या गावाजवळ उजनी उजव्या कालव्यावरचा धोकादायक पूल रविवारी रात्री अचानक कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक पर्यायी रस्त्यावरुन वळवण्यात आली आहे.सदर पुलाच्या ठिकाणी पर्यायी मार्ग करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now