निधीचा गैरवापर केल्यानंतर कारवाई न केल्याने महाराष्ट्र सरकारबाबत न्यायालयाने व्यक्त केली नाराजी; 10 फेब्रुवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
राज्यातील अनुसूचित जमातींच्या कल्याणासाठी देण्यात आलेल्या निधीचा गैरवापर केल्याच्या, 123 अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यास महाराष्ट्र सरकार असमर्थ असल्याबद्दल, मुंबई हायकोर्टाने व्यक्त केली नाराजी.
आज विधानभवनात सभापती रामराजे निंबाळकर आणि नाना पाटोळे यांच्या अध्यक्षतेखाली विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक संपन्न झाली. यामध्ये दि 24 फेब्रुवारीपासून विधिमंडळाचे 2020 मधील अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली.
अधिवेशनाचा कालावधी चार आठवड्यांचा निश्चित झाला आहे.. यात 18 दिवस कामकाज होणार असून, गुरुवार, दि. 6 मार्चला 2020-21 वर्षाचा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार. दि. 24 फेब्रुवारीला पुरवणी व अतिरिक्त मागण्या सादर होणार व पाच प्रस्तावित शासकीय विधेयके मांडण्यात येणार.
आज जामिया येथे झालेल्या निषेधानंतर, निदर्शकांविरोधात न्यू फ्रेंड्स कॉलनी पोलिस ठाण्यात आयपीसी कलम 186, 188, 353, 332 कायद्यान्वये दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांची संकल्पना आणि वन विभागाच्या सहकार्याने पालवनच्या उजाळ माळराणावर, फुललेल्या सह्याद्री देवराई प्रकल्पावर दिनांक 13 व 14 फेब्रुवारी 2020 रोजी जगातील पहिले वृक्ष संमेलन आयोजित
हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेच्या कुटुंबाला 10 लाखांची मदत करण्यात येणार आहे. तसेच कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्याचा निर्णयही राज्य सरकारने घेतला आहे.
वजन कमी करणाऱ्या गोळया घेतल्यानंतर काही तासातच ठाण्यामध्ये एका तरुण मुलीचा मृत्यू झाला आहे. मेघना देवगडकर (वय, 22) असे मृत मुलीचे नाव आहे. मेघना जीममध्ये ट्रेनर म्हणूनही काम करत होती.
पुण्यात विद्यार्थिनीवर अॅसिड टाकण्याची धमकी देऊन अत्याचार करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. पीडितेच्या आईने यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आरोपीला पुणे पोलिसांकडून तात्काळ अटक करण्यात आली आहे.
नाशिकमध्ये कौटुबिंक वादातून एका महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. पंचवटी पोलिस ठाण्याबाहेर या महिलेने स्वत: ला पेटवून घेतलं आहे. या महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
पिंपरी महापालिका, रुग्णालय आणि शाळांमध्ये प्लास्टिकवर बंदी करण्यात आली आहे. प्लास्टिकचा वापर आढळल्यास विभागप्रमुखांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिला आहे.
गडचिरोलीमध्ये मुलीने पळून जाऊन लग्न गेल्याने आई, वडील आणि भावाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रवींद्र वरगंटीवार, वैशाली रवींद्र वरगंटीवार आणि साहिल रवींद्र वरगंटीवार अशी या तिघांची नावं आहे.
दुपारपासून खोळंबलेल्या पीडित शिक्षिकेवरील अंत्यसंस्काराला सुरुवात झाली आहे. निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर कुटुंबियांनी पीडितेवर अत्यसंस्कार करण्यास सुरुवात केली आहे.
गेल्या पाऊण तासापासून खोळंबलेला पीडित शिक्षिकेचा अंत्यसंस्कार विधी आता काहीच वेळात होणार आहे. निवासी उपजिल्हाधिका-यांच्या लेखी आश्वासनानंतर कुटूंबिय मृत शिक्षिकेवर अंत्यसंस्कार करणार आहेत.
'आपण स्त्रीला पंतप्रधान, राष्ट्रपती आणि संरक्षणमंत्री म्हणून पाहू शकलो. पण स्वकर्तृत्वानं पुढं येणाऱ्या सामान्य महिलेला सुरक्षा देऊ शकलो नाही,' अशी खंत माजी मंत्री व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी हिंगणघाट जळीत प्रकरणातील पीडित तरुणीच्या मृत्यूनंतर व्यक्त केली आहे. ट्विटच्या माध्यमातून त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
गेले 7 दिवस मृत्यूशी झुंज देणारी हिंगणघाट प्रकरणातील पीडितेची आज सकाळी प्राणज्योत मालविली. तिच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली असून 'महाराष्ट्राच्या लेकीला' निरोप देण्यासाठी दारोड्यात मोठ्या संख्येने जनसागर उसळला. थोड्याच वेळात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
हिंगणघाटमध्ये पेट्रोल ओतून जाळण्यात आलेल्या शिक्षिकेचा झालेला मृत्यू ही लाजिरवाणी घटना असून आरोपीला त्याच्या कृत्याची शिक्षा लवकर मिळेल, ती इतरांवर जरब बसवणारी असेल असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सरकार यापुढे अधिक संवेदनशील राहील असेही ते प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले.
उद्या लोकसभेत अर्थसंकल्प 2020-21 वर आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रासाठी भाजप खासदारांना व्हिप बजाविण्यात आला आहे. या चर्चासत्रात उपस्थित राहण्यासाठी हा व्हिप बजावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
काय झाले याचा विचार करण्यापेक्षा यावर आता पुढे काय भूमिका घेतली पाहिजे याचा विचार केला पाहिजे असे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे. तसेच महिलांवर होणा-या या भ्याड हल्ल्यांवर, अत्याचार करणा-यांवर कडक कारवाई केली पाहिजे असेही ते यावेळी म्हणाले.
हिंगणघाट जळीत कांडातील पीडितेचा मृत्यू ही दुर्दैवी घटना असून हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात यावा असे काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी सांगितले आहे. लवकरात लवकर या घटनेचा छडा लावून आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा केली जाईल असेही ते प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले.
वर्धा जळीत कांडातील पीडितेचा मृत्यू ही अत्यंत दुर्दैवी घटना असून लवकरात लवकर या आरोपीला शिक्षा झाली पाहिजे असे महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहेत. तसेच अशा घटनांसाठी कायदे अधिक कडक करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
गेल्या कित्येक दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्र ज्या जळीत कांडाने पेटून उठला होता त्या घटनेतील पीडितेचा आज सकाळी दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून ही तरुणी मृत्यूशी झुंज देत होती. आज सकाळी 6.55 मिनिटांनी तिची प्राणज्योत मालवली. डॉ. अनुप मरार यांनी ही ANI शी बोलताना ही माहिती दिली. या पीडितेच्या अंगावर पेट्रोल टाकून तिची निर्घृण रित्या हत्या करणा-या आरोपी विकेशला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्याची वर्धा कारगृहात रवानगी करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी गुप्तता पाळत आरोपीला न्यायालयात हजर केले.
तसेच जगातील सर्वात मानाचा समजला जाणारा ऑस्कर 2020 पुरस्कार सोहळा लॉस एन्जेलिस मध्ये रंगला. हा 92 वा ऑस्कर पुरस्कार सोहळा आहे. यात 'वन्स अपॉन ए टाइम इन हॉलिवूड' ला प्रोडक्शन डिझाइन विभागात पुरस्कार मिळाला. तर ब्रॅड पिट ला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा ऑस्कर मिळाला. जॅकलीन दुरान ही 'लिटिल वूमन' सिनेमासाठी बेस्ट कॉस्च्युम डिझाइन ऑस्करची मानकरी ठरली.
आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचण्यासाठी 'लेटेस्टली मराठी' ला अवश्य भेट द्या.
उद्या दिल्ली विधानसभा निवडणूक 2020 चा निकाल लागणार असून सर्व उमेदवारांसह संपूर्ण देशाला या निकालाची उत्सुकता लागली आहे. दिल्ली विधानसभा निवडणूक कोणत्या पक्षाचे पारडे जड होणार आणि जनमताचा कौल कुणाकडे जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)