Militant Attack in Manipur: कुकी अतिरेक्यांचा मणिपूरमध्ये CRPF बटालियनवर हल्ला; दोन जवान शहीद
त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, तेथे दोघांचा मृत्यू झाला. इतर जखमी जवानांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
Militant Attack in Manipur: मणिपूर (Manipur) च्या नरनसेना परिसरात शुक्रवारी मध्यरात्री कुकी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) दोन जवान शहीद झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री ते पहाटे 2.15 च्या दरम्यान कुकी दहशतवाद्यांनी सीआरपीएफ जवानांवर हल्ला केला. शहीद झालेले जवान हे राज्यातील बिष्णुपूर जिल्ह्यातील नरसेना भागात तैनात असलेल्या CRPF 128 बटालियनचे होते.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, दहशतवाद्यांनी चौकीला लक्ष्य केले आणि डोंगराच्या माथ्यावरून अंदाधुंद गोळीबार केला. रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास सुरू झालेला गोळीबार रात्री अडीच वाजेपर्यंत सुरू होता. दहशतवाद्यांनी बॉम्ब देखील फेकले, ज्यापैकी एक स्फोट सीआरपीएफच्या 128 बटालियनच्या पोस्टमध्ये झाला, जो आयआरबीएन कॅम्पच्या संरक्षणासाठी तैनात होता. या हल्ल्यात सहभागी असलेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबविण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. (वाचा -Indore Akola Bus Accident: इंदौर कडून अकोला कडे जाणार्या बसला अपघात; करोली घाटात कोसळली बस)
या स्फोटात चार जवान जखमी झाले आहेत. त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, तेथे दोघांचा मृत्यू झाला. इतर जखमी जवानांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. (वाचा -Indian Heart Beats Inside Pakistani Woman: पाकिस्तानी तरुणीत आता भारतीय हृदय धडधडणार; कराची येथील 19 वर्षीय मुलीचे चेन्नईत हृदय प्रत्यारोपण)
मणिपूरचे मुख्य निवडणूक अधिकारी, प्रदीप कुमार झा यांनी शुक्रवारी लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात बाहेरील मणिपूरमध्ये उच्च मतदान आणि हिंसाचाराच्या घटनांची नोंद केली. प्रदीप कुमार झा यांनी सांगितले की, आम्हाला सुमारे एक तासापूर्वी मिळालेल्या शेवटच्या अहवालापर्यंत, मतदानाची टक्केवारी 75 टक्क्यांच्या दरम्यान होती. यात कोणतीही मोठी अनियमितता आढळली नाही.
दुसऱ्या टप्प्यातील मतदानादरम्यान लोक मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडले, असेही ते म्हणाले. एका मतदान केंद्रावर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (EVM) बिघडल्याची एक घटना नोंदवली गेली.