DRDO : डीआरडीओ ने विकसीत केला मेटास्टेबल बीटा टायटेनियम मिश्रधातू

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) औद्योगिक पातळीवर उच्च क्षमतेचा मेटास्टेबल बीटा टायटेनियम मिश्रधातू (Metastable Beta Titanium Alloy) संपूर्ण स्वदेशी पद्धतीने विकसित केला आहे.

beta (Photo Credits: PBNS)

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) औद्योगिक पातळीवर  उच्च क्षमतेचा मेटास्टेबल बीटा टायटेनियम मिश्रधातू (Metastable Beta Titanium Alloy) संपूर्ण स्वदेशी पद्धतीने विकसित केला आहे. व्हनेडीयम, लोखंड आणि अल्युमिनियम यांच्या विशिष्ट मिश्रणातून हा  औद्योगिक पातळीवरील Ti-10V-2Fe-3Al  नामक मिश्रधातू तयार करण्यात आला असून त्याचा वापर विमानांतील विविध रचनात्मक भागांच्या  औद्योगिक पातळीवरील निर्मितीसाठी होणार आहे. हा मिश्रधातू डीआरडीओच्या हैदराबाद स्थित  संरक्षण धातूविषयक संशोधन प्रयोगशाळेतील (DMRL) संशोधकांनी विकसित केला आहे. विमानाच्या भागांचे वजन कमी करण्याच्या उद्देशाने गेल्या काही काळापासून अनेक विकसित देशांनी तुलनेने अधिक वजनदार आणि पारंपरिक अशा Ni-Cr-Mo संरचनात्मक पोलादाऐवजी या मिश्रधातूचा वापर सुरु केला आहे.

Ti-10V-2Fe-3Al या मिश्रधातूमध्ये क्षमता आणि वजन यांचे उच्च गुणोत्तर असल्यामुळे उत्तम घडणीचा गुणधर्म असल्याने हवाई वापरासाठीच्या यंत्रांमध्ये कमी वजनासह गुंतागुंतीच्या घटकांची घडण सोप्या रीतीने करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. या मिश्रधातूपासून घडविता येणाऱ्या अनेक सुट्या भागांमध्ये स्लॅट/फ्लॅप ट्रॅक, लँडींग गीयर आणि लँडींग गीयर मधील ड्रॉप लिंक यांचा समावेश आहे. उच्च क्षमतेचा बीटा टायटेनियम मिश्रधातू त्याच्या अधिक क्षमता, लवचिकता, शक्ती आणि भंगविरोधी गुणांमुळे अत्यंत अद्वितीय झाला आहे आणि त्यामुळे विमानांचे विविध सुटे भाग घडविण्यासाठी अधिकाधिक लोकप्रिय होत आहे. तसेच या धातूचा एकदाच करावा लागणारा  तुलनेने कमी खर्च, पोलादापेक्षा अधिक गंजरोधक गुणधर्म यामुळे भारतात देखील या महाग मिश्रधातूचा वापर न्याय्य आणि व्यापारी दृष्ट्या अधिक प्रभावी ठरतो.

नजीकच्या भविष्यकाळात सध्याच्या वापरातील 15 पोलादाच्या भागांऐवजी Ti-10V-2Fe-3Al या मिश्रधातूच्या विविध घडणावळीतून वजनात 40% कपात शक्य करणाऱ्या घटकांचा वापर वैमानिकी विकास संस्थेने (ADA) निश्चित केला आहे. लँडींग गीयर मधील ड्रॉप लिंक हा असा पहिला सुटा भाग आहे जो ADA ने DMRL च्या सहकार्याने बेंगळूरूच्या HAL मधील विमानांच्या  निर्मिती मध्ये यशस्वीपणे वापरलेला आणि हवाई वापरासाठी प्रमाणित झालेला आहे.

विमानांच्या सुट्या भागांच्या घडणीत वापरला जाणारा उच्च क्षमतेचा मेटास्टेबल बीटा टायटेनियम मिश्रधातू संपूर्ण स्वदेशी पद्धतीने विकसित केल्याबद्दल केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओ मधील संशोधकांचे अभिनंदन केले आहे. संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि डीआरडीओचे अध्यक्ष डॉ.जी. सतीश रेड्डी यांनी संपूर्ण स्वदेशी पद्धतीने हे तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या पथकाच्या समर्पित प्रयत्नांचे कौतुक केले आहे.