Karnataka: विवाहबाह्य संबंधांच्या संशयावरून योग शिक्षिकेचे अपहरण, मारहाण; श्वास रोखून मृत्यूचा बनाव करत वाचवला जीव
त्यानंतर मारहाणीत ती मृत झाल्याचा अंदाज बाळगत तिला खड्ड्यात फेकले. मात्र श्वास रोखत मृत्यूचा बनाव आखत तिने आपली सुटका केली.
Karnataka: बेंगळुरू येथील एका 35 वर्षीय योग शिक्षिकेचे चार जणांच्या टोळक्याने अपहरण (Yoga Teacher Kidnapped) करून तिला मारहाण करत जिवंत गाडल्याची घटना घडली. मारहाणीत शिक्षिका मृत झाल्याचा अंदाज बाळगत तिला फांद्या झाकलेल्या खड्ड्यात फेकले. अर्चना रेड्डी असे योग शिक्षीकेचे नाव आहे. मात्र, पेश्याने योग शिक्षीका असल्याने कौशल्याच्या मदतीवर त्यांनी श्वास रोखत मृत झाल्याचे नाटक केले आणि आपला जीव वाचवला. या घटनेत टोळक्याने शिक्षीकेच्याजवळचे पैसे आणि दागिने चोरले.
हल्लेखोर गेल्यानंतर शिक्षिका खड्ड्यातून बाहेर आली. त्यांनी तक्रार देण्यासाठी पोलीस ठाणे गाठले. चिक्कबल्लापूर जिल्हा पोलिस ठाण्यात तिच्या पतीचा मित्र संतोषसोबत असलेल्या कथित संबंधांमुळे तिला लक्ष्य करण्यात आले असल्याचे शिक्षिकेने तक्रारीत म्हटले. संतोषची पत्नी बिंदू हिला त्यांच्या अफेअरबद्दल संशय होता. म्हणून तिने अर्चना यांच्या हत्येचा कट रचला. बिंदूने हा हल्ला करण्यासाठी सतीश रेड्डी या गुन्हेगारी रेकॉर्ड असलेल्या व्यक्तीला काम दिले होते.
रेड्डी यांनी योग शिकण्याची इच्छा असल्याच्या बहाण्याने अर्चनाशी मैत्री केली. तिचा विश्वास जिंकल्यानंतर त्याने शिक्षिकेचे अपहरण करण्याचा कट रचला. इतर तीन जणांसह, त्याने तिला जंगलात नेण्यापूर्वी कारमध्ये शिक्षिकेवर हल्ला केला. पोलिसांनी सतीश रेड्डी आणि बिंदू तसेच नागेंद्र रेड्डी, रमना रेड्डी आणि रवी या तिघांना अटक केली आणि अर्चना यांच्याकडून चोरीला गेलेले रोख आणि दागिने जप्त केले.