IRCTC Big Action: कन्फर्म तिकीट मिळणे होणार सोपे; आयआरसीटीसी ने तिकीट माफियांचा खेळ संपवला
रेल्वे तिकीट आरक्षणातील गैरप्रकार आणि काळाबाजाराला आळा घालण्यासाठी आयआरसीटीसीने मोठी कारवाई करत ३.०४ कोटी युझर आयडी कायमस्वरूपी निष्क्रिय केले असून, ६.३३ कोटी संशयास्पद खाती तात्पुरती निलंबित केली आहेत.
भारतीय रेल्वेच्या तिकीट आरक्षण प्रणालीचा गैरवापर करणाऱ्या दलाल आणि अनधिकृत एजंट्सविरोधात इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (IRCTC) कठोर पावले उचलली आहेत. बनावट खात्यांद्वारे तिकिटांची मोठ्या प्रमाणावर खरेदी करून प्रवाशांची लूट करणाऱ्या टोळ्यांवर कारवाई करताना आयआरसीटीसीने ३.०४ कोटी युझर आयडी थेट निष्क्रिय (Deactivate) केले आहेत. याशिवाय संशयास्पद हालचाली आढळल्यामुळे आणखी ६.३३ कोटी खाती निलंबित (Suspend) करण्यात आली आहेत.
संशयास्पद खात्यांवर कडक निर्बंध
आयआरसीटीसीच्या माहितीनुसार, निलंबित करण्यात आलेल्या खात्यांच्या धारकांना आपली ओळख आणि सत्यता सिद्ध (Verification) करेपर्यंत नवीन तिकीट आरक्षित करता येणार नाही. दलाल बनावट ईमेल आणि ओळखपत्रांच्या साहाय्याने मोठ्या संख्येने खाती उघडून एकाच वेळी अनेक तिकिटे बूक करत असत. नंतर सणासुदीच्या काळात अथवा गर्दीच्या वेळी गरजू प्रवाशांना हीच तिकिटे अव्वाच्या सव्वा दराने विकली जात होती. हा गैरव्यवहार रोखण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली आहे.
गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यापासून आयआरसीटीसीने अशा संशयास्पद नेटवर्कवर पाळत ठेवली होती. या कारवाईदरम्यान तब्बल १६,०४१ संशयास्पद ईमेल डोमेन्स ब्लॉक करण्यात आले आहेत. तसेच सायबर क्राईम पोर्टलवर ५९२ तक्रारी दाखल करण्यात आल्या असून, त्यामध्ये सुमारे ४.२१ लाख संशयास्पद पीएनआर (PNR) क्रमांकांची चौकशी सुरू आहे.
अँटी-बॉट तंत्रज्ञानाचा वापर
तिकीट बुकिंग प्रक्रियेत आधुनिक सॉफ्टवेअर आणि बॉट्सचा (BOTs) होणारा अनधिकृत वापर रोखण्यासाठी आयआरसीटीसीने प्रमुख तंत्रज्ञान भागीदारांच्या मदतीने अँटी-बॉट यंत्रणा कार्यान्वित केली आहे. या नव्या तंत्रज्ञानामुळे गेल्या काही महिन्यांत गैरमार्गाने येणाऱ्या बॉट ट्रॅफिकमध्ये ५५ ते ६५ टक्क्यांपर्यंत घट झाली आहे.
तसेच कन्टेन्ट डिलिव्हरी नेटवर्क (CDN) प्रणाली लागू केल्यामुळे न्यू जनरेशन तिकीटिंग (NGeT) प्रणालीवरील ताण कमी झाला आहे. याचा थेट फायदा सामान्य आणि पडताळणी झालेल्या प्रवाशांना मिळत असून संकेतस्थळाचा वेग सुधारला आहे.
सणासुदीच्या काळात विक्रमी बुकिंग
सध्या देशात आरक्षित होणाऱ्या एकूण तिकिटांपैकी सुमारे ८९ टक्के तिकिटे ऑनलाइन माध्यमातून बूक केली जातात. नुकत्याच सुरू झालेल्या सणासुदीच्या हंगामात ७ सप्टेंबर रोजी आयआरसीटीसीच्या प्रणालीवरून एकाच दिवसात तब्बल २०,०६,३५३ तिकिटे बूक झाली. चालू वर्षातील ही एका दिवसातील विक्रमी नोंद ठरली आहे.
प्रवाशांचा अनुभव अधिक सुलभ करण्यासाठी आयआरसीटीसीने आपल्या प्रणालीत सुधारणा केली असून स्लीपर, थ्री-टायर एसी आणि टू-टायर एसी यांसारख्या विविध श्रेणींची उपलब्धता आता एकाच स्क्रीनवर पाहता येते. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचत असून तिकीट बुकिंग प्रक्रियेत पारदर्शकता येत आहे.