Code Of Conduct: आचारसंहिता म्हणजे काय? त्याची अंमलबजावणी कधीपासून होणार? या कालावधीत कोणते निर्बंध असतील? जाणून घ्या सविस्तर
चला तर मग खालील मुद्द्यांच्या आधारे आदर्श आचारसंहितेसंदर्भात सविस्तर जाणून घेऊयात...
Code Of Conduct: सध्या देशात लोकसभा निवडणुकीमुळे (Lok Sabha Election 2024) सर्व पक्ष प्रचाराला लागले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात जोरदार राजकीय हालचाली सुरू आहेत. निवडणूक आयोग (Election Commission) शनिवारी लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करणार आहे. लोकसभा निवडणुकीसोबतच निवडणूक आयोग काही राज्यांतील विधानसभा निवडणुकाही जाहीर करू शकते. निवडणुकीची घोषणा होताच आदर्श आचारसंहितेची (Code Of Conduct) चर्चा सुरू होते. आचारसंहिता म्हणजे काय? आचारसंहितेची अंमलबजावणी कधीपासून होते ? आदर्श आचारसंहिता कालावधीत कोणते निर्बंध असतात? या सर्व प्रश्नांची उत्तर आज आम्ही तुम्हाला या लेखातून सांगणार आहोत. चला तर मग खालील मुद्द्यांच्या आधारे आदर्श आचारसंहितेसंदर्भात सविस्तर जाणून घेऊयात...
आदर्श आचारसंहिता काय आहे?
मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका घेण्यासाठी निवडणूक आयोगाने काही नियम केले आहेत. आचारसंहितेअंतर्गत पक्ष आणि उमेदवारांसाठी काही मार्गदर्शक तत्त्वे आहेत. या अंतर्गत काही नियम आहेत जे राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी पाळले पाहिजेत. याचे उल्लंघन झाल्यास निवडणूक आयोग कारवाई करू शकतो. या नियमांना आदर्श आचारसंहिता असे म्हणतात. (हेही वाचा -Lok Sabha Elections 2024 Dates Announcement Update: लोकसभा निवडणूक 2024 च्या तारखा 16 मार्चला दुपारी 3 वाजता होणार जाहीर)
आचारसंहिता कधीपासून लागू होते?
निवडणूक आयोगाकडून निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच 'आदर्श आचारसंहिता' लागू होते. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आचारसंहिता लागू राहणार आहे. ही आचारसंहिता विधानसभा निवडणुकीत राज्य पातळीवर आणि लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशात लागू असते.
उमेदवार/पक्षांसाठी आचारसंहितेचे नियम -
- निवडणूक आयोगाने जारी केलेल्या नियमांनुसार, निवडणूक प्रचारादरम्यान कोणताही पक्ष किंवा उमेदवार परस्पर द्वेष निर्माण करणारी किंवा जाती आणि समुदायांमध्ये तेढ निर्माण करणारी कोणतीही कृती करणार नाही.
- निवडणूक प्रचारादरम्यान, नेत्यांनी असत्यापित आरोप करणे किंवा विरोधी पक्ष किंवा नेत्यांवर टीका करणे टाळले पाहिजे.
- कोणताही उमेदवार किंवा पक्ष मंदिर, मशीद, चर्च, गुरुद्वारा किंवा इतर धार्मिक स्थळांचा निवडणूक प्रचारासाठी वापर करू शकत नाही.
- कोणत्याही उमेदवाराला मतांसाठी जातीय भावनांचे आवाहन करता येणार नाही. धर्म/जातीच्या नावावर मते मागता येणार नाही.
- मतदारांना लाच देणे, त्यांना धमकावणे, मतदान केंद्रापासून 100 मीटर अंतरावर प्रचार करणे हे गुन्हेगारी कृत्य मानले जाईल.
- मिरवणुकीत इतर पक्षांना त्रास होणार नाही, असे कोणतेही कृत्य न करणे. एका पक्षाचे पोस्टर दुसऱ्या पक्षाला काढता येणार नाही.
- याशिवाय आचारसंहिता सुरू असताना मतदानाच्या 48 तास आधी निवडणूक प्रचार आणि सार्वजनिक सभा या सर्वांवर बंदी घालण्यात येते.
सत्ताधारी पक्षाचे नियम -
- आचारसंहिता लागू झाल्यानंतर कोणत्याही मंत्र्याला आपला प्रवास निवडणूक प्रचाराशी जोडता येणार नाही.
- नेते किंवा उमेदवार प्रचारासाठी सरकारी वाहने किंवा सरकारी बंगल्यांचा वापर करू शकत नाहीत.
- निवडणूक प्रचारादरम्यान अधिकृत यंत्रणा किंवा कर्मचारी वापरू शकत नाही.
- कोणत्याही पक्षासाठी किंवा उमेदवारासाठी अधिकृत विमान, वाहने इत्यादींसह कोणतीही वाहतूक वापरू शकत नाही.
- आदर्श आचारसंहिता कालावधीत निवडणूक प्रक्रियेशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे संबंधित सर्व अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्तीवर बंदी घालण्यात येते. एखाद्या अधिकाऱ्याची बदली किंवा पदोन्नती ही निवडणूक आयोगाच्या परवानगीनंतर आवश्यक वाटल्यासच केली जाऊ शकते.
- कोणत्याही सरकारी योजनेचे उद्घाटन/घोषणा विशिष्ट क्षेत्रात करण्यास मनाई आहे, म्हणजे कोणत्याही सरकारी योजनेची घोषणा किंवा पायाभरणी समारंभाला परवानगी नाही.
पक्षाच्या कामगिरीच्या जाहिराती सरकारी खर्चाने देता येणार नाहीत. याशिवाय आचारसंहिता काळात खासदार निधीतून कोणताही नवीन निधी देऊ शकत नाहीत.