TDS New Rules: आता Social Media Influencers तसेच डॉक्टरांना भरावा लागू शकतो 10 टक्के टीडीएस, 1 जुलै पासून नवा नियम लागू, जाणून घ्या सविस्तर
रुग्णालय हा एक प्रकारचा नफा समजून आयकर कापून घेईल.
लवकरच सोशल मीडिया इन्फ्लुंसर (Social Media Influencers) यांना प्रमोशनसाठी मिळणाऱ्या गोष्टींवर टीडीएस (TDS) भरावा लागणार आहे. वृत्तानुसार, सरकार व्यवसायांकडून जाहिरातींसाठी मिळणाऱ्या मोफत गोष्टींवर 10 टक्के टीडीएस (TDS) लावणार आहे. यासह डॉक्टरांनादेखील औषध कंपन्या आणि इतरांकडून मिळणाऱ्या मोफत गोष्टींवर कर भरावा लागेल. परंतु प्रमोशन पूर्ण झाल्यावर त्यांनी ते उत्पादन कंपनीला परत केल्यास उत्पादनावर टीडीएस लागू होणार नाही. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) मार्गदर्शक तत्त्वांमध्ये याबाबत माहिती दिली आहे.
जर का तुम्ही डॉक्टर असून हॉस्पिटलमध्ये नोकरी करत असाल, तर तुम्हाला मिळणाऱ्या मोफत औषधांवर तुम्हाला कर भरावा लागेल. रुग्णालय हा एक प्रकारचा नफा समजून आयकर कापून घेईल. कार, टेलिव्हिजन, मोबाईल फोन, मोफत तिकिटे, परदेशी सहली आणि व्यवसायाच्या जाहिरातीसाठी प्रदान केलेल्या इतर वस्तूंसह इतर उत्पादनांवर टीडीएस लागू होईल.
टीडीएसशी संबंधित नवा नियम 1 जुलैपासून लागू होणार आहे. नवीन नियमात आयकर कायद्यात नवीन कलम 194R जोडण्यात आले आहे. ज्या अंतर्गत एका आर्थिक वर्षात 20,000 रुपये किंवा त्याहून अधिक लाभ दिल्यास त्यावर 10 टक्के टीडीएस कापला जाईल. फेब्रुवारी 2022 मध्ये सादर झालेल्या अर्थसंकल्पात त्याची तरतूद करण्यात आली होती. (हेही वाचा: सरकारने बदलले ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याचे नियम; काय आहे नवीन नियम, जाणून घ्या)
अर्थ मंत्रालयाचे सहसचिव कमलेश सी वार्ष्णेय यांनी सांगितले की, अशा सुविधा अतिरिक्त लाभांमध्ये येतात आणि त्यावर कर लागू होईल. या नव्या नियमानुसार, हे आवश्यक नाही की एखाद्याला दिलेल्या रोख लाभांवरच टीडीएस कापला जाईल. तर आता कंपनीच्या संचालकांना दिले जाणारे शेअर्स, कार, प्रायोजित बिझनेस ट्रिप किंवा कॉन्फरन्स इव्हेंटवर टीडीएस मिळेल. त्यामुळे करदात्यांनी हे लक्षात ठेवावे की, तुमच्या हातात असलेले फायदे जरी टॅक्स स्लॅबच्या बाहेर असले तरी त्यावर टीडीएस कापला जाईल.