LPG Gas Cylinder Prices: ग्राहकांना दिलासा! घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये कपात; 1 एप्रिलपासून नवे दर लागू 

आता सरकारने ग्राहकांना काही दिलासा दिला आहे. इंडियन ऑयल लिमिटेडने (Indian Oil Corporation Limited) घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत प्रति सिलेंडर दहा रुपयांनी कपात केल्याची माहिती दिली आहे

LPG (Photo Credits: All India Radio News, Facebook)

अलिकडच्या काही महिन्यांत घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या (LPG Cylinder) किंमतीत मोठी वाढ झाली होती. आता सरकारने ग्राहकांना काही दिलासा दिला आहे. इंडियन ऑयल लिमिटेडने (Indian Oil Corporation Limited) घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत प्रति सिलेंडर दहा रुपयांनी कपात केल्याची माहिती दिली आहे. नवीन किंमती 1 एप्रिल 2021 पासून अंमलात आणल्या जातील. यापूर्वी विश्वासू सरकारी सूत्रांनी सांगितले होते की, पेट्रोल आणि डिझेलबरोबरच एलपीजी गॅसचे दरही कमी होतील. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत पुन्हा घसरत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या कारणांमुळे या उत्पादनांची किंमत कमी होईल. गेल्या एका आठवड्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर तीन वेळा कमी झाले आहेत.

सध्या दिल्लीमध्ये 14.2 किलो विना अनुदानित गॅस सिलिंडरची किंमत 819 रुपये, कोलकातामध्ये 845.50 रुपये, मुंबईत 819 रुपये आणि चेन्नईमध्ये 835 रुपये आहे. किंमत कपातीनंतर 1 एप्रिलपासून हा दर कमी होऊन दिल्लीमध्ये 809 रुपये, कोलकातामध्ये 835.50 रुपये, मुंबईत 809 रुपये आणि चेन्नईमध्ये 825 रुपये होईल. स्वयंपाकाच्या गॅसची किंमत गेल्या महिन्यांमध्ये वाढली आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात एलपीजीच्या किंमतीत 125 रुपयांनी वाढ झाली आहे. 4 फेब्रुवारीला किंमत 25 रुपयांनी वाढली, त्यानंतर 15 फेब्रुवारीला 50 रुपयांनी, त्यानंतर 25 फेब्रुवारीला पुन्हा 25 रुपयांनी व 1 मार्चला पुन्हा 25 रुपयांनी वाढ झाली. (हेही वाचा: Rules Changing From 1st April: नव्या आर्थिक वर्षात बदलणार हे '6' नियम)

मागच्या काही काळापासून कच्च्या तेलाची किंमत घसरताना दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तो 64 डॉलरच्या पातळीवर ट्रेड करीत होता. मार्चच्या सुरुवातीच्या आठवड्यात तो 71 डॉलर पर्यंत पोहोचला होता. किरकोळ पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीं क्रूड तेलाच्या दरावर अवलंबून असते, असे सरकारी सूत्रांनी सांगितले. अशा परिस्थितीत हे दर येत्या काही दिवसांत अजून कमी होतील अशी आशा आहे.