ITR Filing Benefits: जाणून घ्या इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याचे नक्की काय फायदे होतात; 31 जुलै पूर्वी भरा तुमचा आयटीआर 

तुम्ही 31 जुलै 2022 च्या अंतिम मुदतीनंतर, पण 31 डिसेंबर 2022 पूर्वी तुमचा आयटीआर सबमिट केल्यास तुम्हाला 5 हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल.

Income Tax Return File | (Images for symbolic purposes only। Photo Credits: pixabay)

आयकर भरण्याची शेवटची तारीख जवळ येत आहे. तुम्ही अद्याप तुमचे रिटर्न भरले नसल्यास, ते लवकर करा. सध्या आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै आहे. महसूल सचिवांनी शुक्रवारी स्पष्ट केले की सरकार आयकर रिटर्न भरण्यासाठी 31 जुलैची अंतिम मुदत वाढवण्याच्या विचाराधीन नाही. आयटीआर दाखल करणे अनेक बाबतीत फायदेशीर ठरते आणि ते दाखल न करणे काही प्रसंगी त्रासदायक ठरू शकते. आजच्या काळात अशी अनेक महत्त्वाची आर्थिक कामे आहेत, जिथे आयकर विवरणपत्राची मागणी केली जाते. जर तुम्ही वेळेवर सातत्याने आयटीआर भरला असेल, तर तुम्हाला त्यांचा फायदा मिळतो, नाहीतर काही ठिकाणी नुकसान होऊ शकते.

आर्थिक वर्षात नवीन कर प्रणाली अंतर्गत एखाद्या व्यक्तीचे एकूण वार्षिक उत्पन्न 2,50,000 लाखापेक्षा जास्त असल्यास, कर नियमांनुसार, कर विवरण सादर करणे आवश्यक आहे. अनेकांना आयटीआर भरण्याचे फायदे माहीत नसतात, त्यामुळे आज आम्ही तुम्हाला आयटीआर भरण्यामुळे नक्की काय फायदे होऊ शकतात हे सांगत आहोत.

बँकेकडून सहज कर्ज मिळू शकते-

इन्कम टॅक्स रिटर्न हा तुमच्या उत्पन्नाचा पुरावा आहे. तो सर्व सरकारी आणि खाजगी संस्थांनी उत्पन्नाचा पुरावा म्हणून स्वीकारला आहे. जर तुम्ही नियमितपणे आयटीआर फाइल करत असाल तर तुम्हाला बँकेकडून सहज कर्ज मिळू शकते. अशा अनेक वित्तीय संस्था आहेत ज्या तुमच्या आयटीआरमध्ये टाकलेल्या माहितीच्या आधारे कर्ज देतात.

व्हिसासाठी आयटीआर आवश्यक आहे -

जर तुम्ही दुसऱ्या देशात जात असाल, तर व्हिसासाठी अर्ज करताना तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्नसाठी विचारले जाऊ शकते. अनेक देशांचे व्हिसा अधिकारी व्हिसासाठी 3 ते 5 वर्षांचा आयटीआर मागतात. आयटीआरद्वारे ते तपासतात की ज्या व्यक्तीला त्यांच्या देशात यायचे आहे, त्याची आर्थिक स्थिती काय आहे.

व्यवसाय सुरू करण्यासाठी आयटीआर आवश्यक आहे-

व्यवसाय सुरू करण्यासाठीही आयकर रिटर्न भरणे खूप महत्त्वाचे आहे. तुम्हाला कोणत्याही विभागाकडून कंत्राट घ्यायचे असेल तर आयटीआर कामी येईल. कोणत्याही सरकारी विभागात कंत्राट घेण्यासाठी गेल्या 5 वर्षांचा आयटीआर आवश्यक आहे.

विमा संरक्षणा आवश्यक आहे-

तुम्हाला मोठ्या रकमेचे विमा संरक्षण (टर्म प्लॅन) घ्यायचे असेल, तर विमा कंपन्या तुम्हाला आयटीआर मागू शकतात. उत्पन्नाचा स्रोत जाणून घेण्यासाठी आणि त्याची नियमितता तपासण्यासाठी आयटीआर आवश्यक आहे. तुमचा आयटीआर जितका मोठा असेल तितके मोठे कव्हर तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे.

मोठ्या रकमेच्या व्यवहारांसाठी आवश्यक-

जर तुम्ही मोठ्या रकमेचा कोणताही व्यवहार करत असाल तर आयटीआर तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकेल. आयटीआर वेळेवर दाखल केल्यामुळे, तुम्हाला मालमत्ता खरेदी-विक्री, बँकेत मोठी रक्कम जमा करणे, म्युच्युअल फंडात मोठी गुंतवणूक केल्यावर आयकर विभागाकडून नोटीस मिळण्याचा धोका नाही. (हेही वाचा: स्टेट बँकेने बदलले एटीएममधून पैसे काढण्याचे नियम; जाणून घ्या प्रक्रिया, नाहीतर होऊ शकते फसवणूक)

दरम्यान, आयटीआर उशिरा भरल्यास दंड आकारला जाईल. तुम्ही 31 जुलै 2022 च्या अंतिम मुदतीनंतर, पण 31 डिसेंबर 2022 पूर्वी तुमचा आयटीआर सबमिट केल्यास तुम्हाला 5 हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल. मात्र, ज्यांचे एकूण उत्पन्न 5 लाखांपेक्षा कमी आहे अशा करदात्यांना विलंबित आयटीआरचा दंड 1 हजार रुपये असेल.