New EPFO Portal: PF खात्यातील पैशांवर पूर्ण नियंत्रण, UAN ॲक्टिव्हेशनपासून ते खात्यात थेट पैसे जमा होईपर्यंत; EPFO वरील 8 'सुपरफास्ट' ट्रिक्स

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) अधिकृत पोर्टलवर नोकरदारांसाठी अनेक महत्त्वाच्या सेवा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यूएएन ॲक्टिव्हेशन, पीएफ ॲडव्हान्स, क्लेम ट्रान्सफर आणि ई-नॉमिनेशन यांसारखी ८ प्रमुख कामे कर्मचारी घरबसल्या कशी पूर्ण करू शकतात, याचा सविस्तर आढावा.

EPFO

कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटनेने (EPFO) आपल्या डिजिटल प्रणालीमध्ये मोठे बदल करत कर्मचाऱ्यांसाठी सेवा अधिक सुलभ केल्या आहेत. ईपीएफओ पोर्टलच्या माध्यमातून नोकरदार वर्ग कार्यालयाच्या फेऱ्या न मारता घरबसल्या आपल्या पीएफ खात्याशी संबंधित कामे पूर्ण करू शकतो. यूएएन ॲक्टिव्हेशन, पीएफ शिल्लक तपासणे, पैसे काढणे आणि केवायसी अपडेट करणे यासह अनेक सेवा आता डिजिटल स्वरूपात उपलब्ध आहेत.

१. यूएएन (UAN) ॲक्टिव्हेशन

ईपीएफओच्या ऑनलाइन सेवांचा लाभ घेण्यासाठी युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) ॲक्टिव्हेट असणे अनिवार्य आहे. पोर्टलवरील 'ॲक्टिव्हेट यूएएन' पर्यायावर जाऊन कर्मचारी आपला यूएएन, आधार क्रमांक, नाव, जन्मतारीख आणि आधार लिंक असलेला मोबाईल क्रमांक टाकून आधार ओटीपीद्वारे हे ॲक्टिव्हेशन सहज पूर्ण करू शकतात.

२. यूएएन जाणून घेणे आणि नवीन यूएएन जनरेशन

कर्मचाऱ्याला आपला यूएएन क्रमांक माहीत नसल्यास तो 'नो युवर यूएएन' (Know Your UAN) या सुविधेचा वापर करून मूलभूत माहितीच्या आधारे क्रमांक मिळवू शकतो. यासाठी पूर्वीच्या कंपनीवर अवलंबून राहण्याची गरज पडत नाही. याशिवाय पोर्टलवर 'डायरेक्ट यूएएन अलॉटमेंट'द्वारे स्वतःहून नवीन यूएएन तयार करण्याची सुविधाही उपलब्ध आहे.

३. ऑनलाइन पीएफ काढणे (PF Withdrawal)

यूएएन सक्रिय झाल्यानंतर कर्मचारी कंपनीच्या सही किंवा मंजुरीशिवाय थेट क्लेम सबमिट करू शकतात. यामध्ये संपूर्ण पीएफ सेटलमेंटसाठी फॉर्म १९, पेन्शनसाठी फॉर्म १०-सी आणि आणीबाणीच्या काळात ॲडव्हान्स पीएफ काढण्यासाठी फॉर्म ३१ उपलब्ध आहेत. फॉर्म ३१ द्वारे ॲडव्हान्स मागताना कोणत्याही कागदपत्रांची गरज नसते, केवळ ऑनलाइन अर्ज हाच स्वघोषणा (self-declaration) मानला जातो.

४. पीएफ पासबुक आणि शिल्लक तपासणे

सदस्य ईपीएफओच्या पासबुक पोर्टलवरून आपले संपूर्ण पासबुक डाउनलोड करू शकतात आणि खात्यातील जमा रक्कम पाहू शकतात. याशिवाय नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून ९९६६०४४४२५ वर मिस्ड कॉल देऊन किंवा ७७३८२९९८९९ वर एसएमएस पाठवूनही शिल्लक तपासता येते.

५. ई-नॉमिनेशन (e-Nomination) भरणे

ईपीएफ नियमांनुसार खात्यावर वारसदार (नॉमिनी) नोंदवणे आवश्यक आहे. सेवेत असताना कर्मचारी पोर्टलवरून ई-नॉमिनेशन करू शकतात आणि त्यात वेळोवेळी बदलही करू शकतात. यामुळे कर्मचाऱ्याच्या पश्चात कुटुंबाला पीएफ, पेन्शन आणि विमा (EDLI) लाभ मिळण्यात कोणतीही कायदेशीर अडचण येत नाही.

६. ऑनलाइन केवायसी (KYC) अपडेट

पीएफ क्लेम विनाअडथळा मंजूर होण्यासाठी केवायसी पूर्ण असणे आवश्यक आहे. पोर्टलवरील 'केवायसी' पर्यायाचा वापर करून बँक खात्याचा तपशील, आधार आणि पॅन कार्ड ऑनलाइन लिंक व अपडेट करता येते.

७. नोकरी बदलताना पीएफ खात्याचे ट्रान्सफर

कर्मचाऱ्याने कंपनी बदलल्यास मागील पीएफ खात्यातील रक्कम नवीन खात्यात वर्ग करण्यासाठी ऑनलाइन ट्रान्सफर क्लेम सादर करता येतो. मेंबर इंटरफेसवरूनच 'वन मेंबर - वन ईपीएफ अकाउंट' सुविधेचा लाभ घेऊन ट्रान्सफर प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करता येते.

८. डेथ क्लेम आणि अन्य सेवा

कर्मचाऱ्याचे अकाली निधन झाल्यास त्याच्या कुटुंबातील सदस्यांना किंवा नॉमिनीला पोर्टलवरून थेट डेथ क्लेम आणि पेन्शन क्लेम दाखल करण्याची सुविधा देण्यात आली आहे. या सर्व सेवांसाठी आधार-लिंक असलेला सक्रिय मोबाईल क्रमांक आणि बँक तपशील अचूक असणे आवश्यक आहे.

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement