Consecration Ceremony of Ram Lalla Mandir at Ayodhya Schedule: रामलल्लांच्या स्वागतासाठी अयोद्धा सज्ज; 16 ते 22 जानेवारी दरम्यान पहा कधी, कोणते होणार विधी?
तळघरात राम लल्ला विराजमान असतील तर पहिल्या मजल्यावर श्रीरामाचा दरबार असेल जिथे श्रीरामांसोबत सीतामाईंची देखील मूर्ती विराजमान असेल.
अयोद्धेचं राम मंदिर (Ayodhya Ram Mandir) अखेर पूर्णत्वास आलं आहे. श्रीराम यांचा अखेर मंदिरामध्ये प्रवेश होणार आहे. या सोहळ्यासाठी मंदिर ट्रस्ट कडून तयारी केली जात आहे. 22 जानेवारीला या राम जन्मभूमीच्या मंदिरात राम लल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा (Ram Lalla Pranpratishtha) होणार आहे पण धार्मिक विधींना सुरूवात मात्र 16 जानेवारीपासून होत आहे. मंदिर प्रशासनाकडून या मंदिरातील धार्मिक विधींचे वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. 22 जानेवारीला मृगशीर्ष नक्षत्राच्या मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी राम मंदिरामध्ये रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणार आहे.
वाराणसीचे पंडित लक्ष्मिकांत दीक्षित या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची पूजा करणार आहेत. 86 वर्षीय दीक्षित मुख्य पुजारी आहेत. नक्की वाचा: Ayodhya Ram Mandir Aarti Passes: अयोद्धा राम मंदिरात ऑनलाईन, ऑफलाईन आरती पास देण्यास सुरूवात; इथे पहा दर्शन, आरतीच्या वेळा आणि पास कसा मिळवाल?
16-22 जानेवारी 2024 मधील धार्मिक विधींचे वेळापत्रक
16 जानेवारी: मंदिर ट्रस्टने नियुक्त केलेल्या यजमानाकडून प्रायश्चित्त, शरयू नदीच्या काठावर दशविद स्नान, विष्णूपूजा आणि गोदान.
17 जानेवारी: रामलल्लांच्या मूर्तीसह मिरवणूक अयोध्येला जाणार, मंगल कलशात शरयू जल घेऊन भक्त मंदिरात पोहोचणार
18 जानेवारी: गणेश अंबिका पूजन, वरुण पूजन, मातृका पूजन, ब्राह्मण वरण, वास्तुपूजा इत्यादी विधींची सुरुवात होईल.
19 जानेवारी: अग्नी स्थापना, नवग्रह स्थापना आणि हवन
20 जानेवारी: मंदिराचे गर्भगृह शरयू नदीच्या पवित्र पाण्याने धुतल्यानंतर तेथे वास्तुशांती आणि अन्नाधिवास होईल.
21 जानेवारी: 125 कलशांसह शाही स्नानानंतर शयाधीवस होईल.
22 जानेवारी: सकाळच्या पूजेनंतर रामलल्लांची मूर्ती विराजमान केली जाईल. हा विधी मृगशीर्ष नक्षत्रावर होईल.
श्रीराम जन्मभूमी मंदिरच्या निर्माणाचे 3 टप्पे आहेत. यामध्ये पहिला टप्पा हा जानेवारी 2024 मध्ये पूर्ण होत आहेत ज्यात रामलल्लांची मूर्ती विराजमान होत आहेत. त्यानंतर 2024 मध्येच दुसरा टप्पा पूर्ण होणार आहे तर पुढे अजून एक दीड वर्षात उर्वरित आणि तिसरा टप्पा पूर्ण केला जाईल. आता प्राणप्रतिष्ठेनंतर भाविकांना मंदिरात श्रीरामाचे दर्शन घेता येणार आहे. हे मंदिर दुमजली आहे. तळघरात राम लल्ला विराजमान असतील तर पहिल्या मजल्यावर श्रीरामाचा दरबार असेल जिथे श्रीरामांसोबत सीतामाईंची देखील मूर्ती विराजमान असेल.