Gujarat Shocker: गुजरातमध्ये तोतया ओयएएस अधिकाऱ्याचा पर्दाफाश; नागरिकांची लाखोंची फसवणूक केल्याचे उघड
त्याशिवाय, अहमदाबादच्या पालडी भागात त्याचा ट्रॅव्हल्सचा व्यवसाय होता. स्वतःला गुजरात सरकारच्या महसूल विभागाचे संचालक असल्याची ओळख तो देत होता.
Gujarat Shocker: बनावट आयएएस (Fake IAS)अधिकारी दाखवून लोकांची फसवणूक करणाऱ्या मेहुल शाह नावाच्या व्यक्तीला अहमदाबाद गुन्हे शाखेने अटक केली आहे. मेहुल शाह हा अहमदाबादच्या (Ahmedabad) पालडी भागात राहतो. तेथे त्याचा ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. स्वतःला गुजरात सरकारच्या महसूल विभागाचे संचालक असल्याची ओळख देऊन गांधीनगर गृह मंत्रालयाच्या बनावट पत्राचा (Fake Government Document) वापर करून त्याने लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे सांगितले जात आहे. (Ghaziabad: बनावट IAS दाखवून महिलेने अनेकांची केली फसवणूक, उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील घटना - व्हिडिओ)
तक्रारदार राजेंद्र शाह यांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार, मेहुल शाह याने अहमदाबाद जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांकडून आपल्या मुलाला सरकारी शाळेत नोकरी लावण्यासाठी बनावट पत्र दिले होते. याशिवाय शाह याने एका व्यक्तीला असरवा विद्यापीठात एका कामाचे कंत्राट देऊन सात लाख रुपये दिले नाहीत. यानंतर स्थानिक पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली.
तपासादरम्यान पोलिसांना कळले की मेहुल शाह बनावट आयएएस अधिकारी म्हणून सायरन लावलेल्या इनोव्हा कारमध्ये फिरत असे. या सायरनसाठी त्याने गृह मंत्रालय आणि इतर सरकारी विभागांची बनावट पत्रे वापरली. तो स्वत:ला महसूल विभागाचे संचालक आणि आयएएस अधिकारी म्हणवायचा.
पोलिसांनी मेहुल शहाकडून दोन मोबाईल फोन, एक लॅपटॉप, 1,00,000 रुपये रोख, बनावट आधार कार्ड, बनावट सरकारी ओळखपत्र आणि अनेक बनावट सरकारी पत्रे जप्त केली आहेत. या कागदपत्रांमध्ये महसूल विभाग, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग आणि मुख्यमंत्री गृहनिर्माण योजनेच्या नावाने बनवलेल्या बनावट पत्रांचा समावेश आहे.
अहमदाबाद क्राइम ब्रँचच्या म्हणण्यानुसार, आरोपी मेहुल शाह याने स्वतःला विज्ञान आणि संशोधन विकास विभागाचा अध्यक्ष घोषित केले होते. या विभागाचे अध्यक्ष असल्याचे सांगून लेटरपॅड तयार करण्यात आले. जे जप्त करण्यात आले आहे. सध्या त्याने किती लोकांची फसवणूक केली आणि या प्रकरणात आणखी कोणाचा हात आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत. यापूर्वी गुजरातमध्ये बनावट पीएमओ अधिकाऱ्यासह बनावट पोलीस अधिकारीही पकडले गेले आहेत.