निर्भयाच्या मित्राने मुलाखत देण्यासाठी वाहिन्यांकडून उकळले होते हजारो रुपये; पत्रकार अजित अंजुम यांचा Twitter वर गौप्यस्फोट
2012 साली देशाला हादरवून टाकलेल्या निर्भया बलात्कार घटनेमध्ये त्या भीषण रात्री निर्भया सोबत असणाऱ्या त्या घटनेचा महत्वाचा साक्षिदार निर्भयाच्या त्या मित्राने वाहिन्यांना दिलेल्या मुलाखतींसाठी हजारो रुपये उकळले असल्याचं त्यांनी म्हटलं आहे
ज्येष्ठ पत्रकार अजित अंजुम (Ajit Anjum) यांनी शनिवारी केलेल्या ट्विट्समध्ये एक गौप्यस्फोट केलेला आहे. 2012 साली देशाला हादरवून टाकलेल्या निर्भया बलात्कार (Nirbhaya Rape Case) घटनेमध्ये त्या भीषण रात्री निर्भया सोबत असणाऱ्या त्या घटनेचा महत्वाचा साक्षिदार निर्भयाच्या त्या मित्राने वाहिन्यांना दिलेल्या मुलाखतींसाठी हजारो रुपये उकळले असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अंजुम यांनी न्यूज 24 साठी केलेल्या स्टिंग ऑपरेशनचा दाखला देत हे विधान केले आहे.
न्यूज 24 आणि इंडिया टुडेचे माजी व्यवस्थापकीय संचालक असलेले अजित अंजुम म्हणतात,''त्या मुलाच्या डोळ्यात मला कधीही दुःख दिसलं नाही. त्याच्या बोलण्यात मला कधीही निर्भयाच्या किंकाळ्यांचा आक्रोश जाणवला नाही. दुसरा कोणीही असता तर तो प्रसंग कथन करताना प्रत्येक वेळी भावनाविवश झाला असता. पण हा तर पैसे घेऊन मुलाखत देत होता. कोणास ठाऊक त्याने खरंच त्या रात्री तिला वाचवण्याचे काही प्रयत्न सुद्धा केले होते की नाही.''
''स्टुडिओच्या बाहेर आल्यावर मला राग अनावर झाला. माझा मुद्दा हाच होता की 'तुझ्या डोळ्यांसमोर इतकं पाशवी कृत्य झालेलं आहे. तिने प्राण गमावले आहेत. तुझा जीव वाचला आहे म्हणून तू चॅनेल्सना ही स्टोरी विकून पैसे कसा उकळू शकतोस?' आम्ही त्याला सक्त ताकीद दिली की आता तू जर पैसे लाटण्याचे प्रयत्न केलेलस तर आम्ही तुला एक्सपोज करू. त्यानंतर तो गायबच झाला."
2012 सालच्या या घटनेमुळे स्त्रियांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. त्यानंतर सरकारला शारीरिक अत्याचारांशी संबंधित कायद्यामध्ये बदल करणे भाग पडले होते.